बस सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : तोडगा काढण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
बेळगाव आगारी कल्लेहोळ येथील बससेवा विस्कळीत झाली आहे. दिवसभरामध्ये एक अथवा दोनच बस फेऱया सुरू तर कधी कधी एकही बस गावाकडे फिरकत नसल्याने विद्यार्थी, प्रवासी वर्गाची गैरसोय होत आहे. या निषेधार्थ गावातील विद्यार्थी, नागरिक व प्रवाशांनी बस आगारावर मोर्चा नेऊन त्यांना निवेदन दिले. बेळगाव-वेंगुर्ले मार्गापासून दीड ते दोन किलोमीटरवर कल्लेहोळ असल्याने या गावाशी इतर कुठल्याही बसचा संपर्क नाही. गावाला बस आली नाही तर रोज विद्यार्थी व प्रवाशांना दोन किलोमीटर अंतर चालत कल्लेहोळ फाटय़ावर यावे लागते. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. अशा काळात सदर बसफेरी पूर्णतः कोलमडली आहे. यापूर्वी गावाला दिवसातून 12 बस फेऱया होत्या. बस चालक व वाहक यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे आलेली बस पाच मिनिटेदेखील न थांबता गावाला वळसा घालून निघून जाते. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचे बसपास आहेत. बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना टेम्पो अथवा खासगी वाहनां आधार घ्यावा लागतो आणि पुन्हा पैसे मोजावे लागतात.
अन्यथा बस रोको आंदोलन छेडणार
सदर बस सेवा तातडीने सुरळीत करावी, अन्यथा बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर बस रोको आंदोलन छेडण्याचा इशारा कल्लेहोळ गावातील नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थी वर्गाने दिला आहे. कल्लेहोळ गावाला विस्कळीत झालेल्या बससेवा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयालाही सदर प्रवासी वर्गाने भेट देऊन त्यांनाही निवेदन दिले आहे. निवेदनाची प्रत वाहतूक मंत्र्यांनाही पाठविण्यात आली आहे. शुक्रवारी केएसआरटीसीच्या डेपो मॅनेजरची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुळगा ग्रामपंचायतो माजी सदस्य मलाप्पा शहापूरकर, हिंडलगा ग्रामपंचायतो माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर तसेच ग्रामपंचायत सदस्य रमेश यशवंत खन्नुरकर, धनश्री पाटील, प्रेमा शहापूरकर, सीमा पाटील, विद्यार्थी, प्रवाशांसह मोठय़ा प्रमाणात नागरिक निवेदन देताना उपस्थित होते.









