कोल्हापूर :
आयपीएलच्या धर्तीवर प्रथमच आयोजित कोल्हापूर चॅम्पियन लीग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तपोवन येथील एस. एम. स्पोर्टस्ने बजापराव माजगावकर तालीम येथील विरा चॅम्पियनला 5 गडी राखून पराभूत करत विजेतेपद पटकावले. दुधाळी मैदानात प्रकाशझोतामध्ये झालेला हा सामना पाहण्यासाठी चार ते पाच हजार क्रिकेटप्रेमींची उपस्थिती होती. आपल्या अष्टपैलू खेळीने उपस्थितांची मने जिंकतानाच एस. एम. स्पोर्टस्ला अजिंक्यपदाचा सरताज मिळवून देणाऱ्या एस. एम. स्पोर्टस्च्या इंद्रजित पाटीलला सामनावीर म्हणून निवडले. मॉर्निंग स्पोर्टस् क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येकी 8-8 षटकांमध्ये स्पर्धेतील सामने खेळवले. यानंतर झालेल्या उपांत्य सामन्यांमध्ये एस. एम. स्पोर्टस्ने राजस्थान रॉयल्स विराट स्पोर्टस्ला मात देत अंतिम फेरीत धडक दिली. तसेच विरा चॅम्पियनने ड्रीम चेसर्स्वर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर प्रकाशझोतात एस. एम. स्पोर्टस् व विरा चॅम्पियन यांच्यात अंतिम सामना झाला. प्रथम फलंदाजी विरा चॅम्पियनने 8 षटकात 8 बाद 59 धावांचे आव्हान एस. एम. स्पोर्टस्समोर ठेवले. या 59 धावांमध्ये राहूल इंगळेने 20 चेंडूत 28 आणि इंद्रजित बावडेकरने 13 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. गोलंदाजी करताना एस. एम. स्पोर्टस्च्या इंद्रजित पाटीलने बळींची हॅटट्रीक साधत उपस्थितांची दाद मिळवली. प्रत्युत्तरादाखल खेळताना एस. एम. स्पोर्टस्ने 7.2 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावा करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. एस. एम. स्पोर्टस्ला विजेतेपदी विराजमान करण्यासाठी धनराज सोनुलेने 19 चेंडूत 21 व अभिषेक पाटीलने 16 चेंडूत 24 धावा ठोकण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली.
- एस. एम. स्पोर्टस्ला एक लाख रुपये बक्षीस
बक्षीस वितरण समारंभात स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या एस. एम. स्पोर्टस्ला 1 लाख ऊपये व चषक देऊन सन्मानित केले. उपविजेत्या विरा चॅम्पियन संघालाही 50 हजार ऊपये व चषक देऊन गौरवले. यावेळी माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, रमेश पुरेकर, उद्योजक अऊण सोनवणे, विकी महाडिक, सागर जाधव, अभिमन्यू गवळी, धनाजी कारंडे, दुधाळी मॉर्निंग स्पोर्टस्चे श्रीधर गाडगीळ, अभिजीत ढेरे, योगेश सूर्यवंशी, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते.
मालिकावीर : धनराज सोनुलेने (एस. एम. स्पोर्टस्)- 5 हजार ऊपयांचे बक्षीस
उत्कृष्ट गोलंदाज : सचिन अर्दाळकर (एस. एम. स्पोर्टस्)-3000 रुपये
उत्कृष्ट फलंदाज : शुभम मडके (ड्रीम चेसर्स)-3000 रुपये
सामनावीर : इंद्रजित पाटील (एस. एम. स्पोर्टस्)-1 हजार रुपये.
स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यातील सामनावीराला 1 हजार रुपयांचे बक्षीस
- प्रकाशझोतात सामने, संघांना रंगीत किट भेट…
स्पर्धेत 16 संघांनी प्रतिनिधीत्व केले. या संघांमध्ये ऑक्शन पद्धतीने कोल्हापूर जिह्यातील 240 खेळाडूंनी निवड केली. एका हॉटेलमध्ये ऑक्शन झाले. तसेच मॉर्निंग स्पोर्टस् क्लबकडून सोळाही संघातील खेळाडूंना रंगीत किट देण्यात आले. सोळाही संघांमध्ये दिवसा 4 सामने तर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंतचे 3 सामने प्रकाशझोतात खेळवले.








