पालकमंत्र्यांचा प्रल्हाद जोशींवर पलटवार
बेळगाव : राहुल गांधी हे एक अनुभवी व प्रबुद्ध राजकीय नेते आहेत. या विश्वासानेच देशातील जनतेने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शंभरहून अधिक जागांवर विजय मिळवता आला. काही राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. त्यांच्यावर जे टीका करीत आहेत, त्यांना ना जीएसटी ना टॅक्स अशा शब्दात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर पलटवार केला आहे. मुगळखोड, ता. रायबाग येथे पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, ते एक प्रबुद्ध राजकारणी आहेत. म्हणून त्यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळेच शंभरहून अधिक जागा मिळाल्या आहेत. केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना सतीश जारकीहोळी यांनी राहुल गांधी यांच्यातील नेतृत्व गुणांचे कौतुक केले.
जिल्ह्यात पाणीसमस्या उद्भवू नये म्हणून कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. शेतीकामांसाठी, जनावरांसाठी, पिण्यासाठी जास्त पाण्याची गरज आहे. त्यामुळेच पाणी सोडण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पाण्याची कमतरता भासू नये, याची काळजी घेण्यात येणार आहे. कुठे कुठे समस्या आहेत, त्या परिसरात आपण भेट देऊन पाहणी केली आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांनाही सूचना केल्याचे सांगितले. कारखान्यातील दूषित पाण्यामुळे कृष्णा नदी कलुषित होत आहे. याकडे पत्रकारांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असता नदी कलुषित होऊ नये, लोकप्रतिनिधींनीही याची काळजी घ्यावी, यासंबंधी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.
लिंबूसोडा पिऊन तहान भागवली
सोमवारी जिल्हा दौऱ्यादरम्यान पालकमंत्र्यांनी पालभावी येथील रस्त्याशेजारी असलेल्या एका लहानशा शीतपेयांच्या दुकानात लिंबूसोडा पिऊन त्यांनी आपली तहान भागवली. यावेळी काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते उपस्थित होते.









