अध्यक्ष लुकाशेंको यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था /मिन्स्क
रशियाच्या अण्वस्त्रांचा ताफा बेलारुस येथे पोहोचू लागला आहे. बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झेंडर लुकाशेंको यांनी याची पुष्टी दिली आहे. आमच्या देशाला क्षेपणास्त्रs अन् बॉम्ब प्राप्त झाले आहेत. हे बॉम्ब 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी येथे पाडविण्यात आलेल्या बॉम्बच्या तुलनेत 3 पट अधिक धोकादायक असल्याचे लुकाशेंको यांनी सांगितले आहे. 1991 नंतर पहिल्यांदाच रशियाने विदेशी भूमीवर स्वत:ची अण्वस्त्रs तैनात केली आहेत. अण्वस्त्रांचा योग्यप्रकारे साठा करण्यासाठी सोव्हियत महासंघाच्या काळातील 6 आण्विक केंद्रांची डागडुजी करण्यात आली आहे. पाश्चिमात्य देश आमचे अनेक तुकडे करू पाहत होते. बेलारुस हा देश नेहमीच पाश्चिमात्यांच्या निशाण्यावर राहिला आहे. परंतु हे चित्र आता बदलणार असल्याचा दावा लुकाशेंको यांनी केला आहे.
प्रसंगी अण्वस्त्रांचा वापर करू
गरज भासल्यास या अण्वस्त्रांचा वापर करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. या अण्वस्त्रांच्या वापराकरता मला केवळ रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना एक फोन करावा लागेल, असे वक्तव्य लुकाशेंको यांनी केले आहे. तर बेलारुसमध्ये तैनात या अण्वस्त्रांवर रशियाचे नियंत्रण राहणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. रशियाची आण्विक संस्था या अण्वस्त्रांची देखभाल करणार आहे. रशियाच्या अण्वस्त्रांना बेलारुसच्या सीमावर्ती भागांमध्ये तैनात करणार असल्याचा दावा लुकाशेंको यांनी केला आहे. बेलारुसची सीमा 3 नाटो देशांना लागून आहे, यात लिथुआनिया, लातविया आणि पोलंडचा समावेश आहे.
निर्णयामागील रशियाची भूमिका
25 मार्च रोजी पुतीन यांनी बेलारुसमध्ये अण्वस्त्रs तैनात करण्याची घोषणा केली होती. लुकाशेंको हे दीर्घकाळापासून अण्वस्त्रs बेलारुसमध्ये तैनात करण्याची मागणी करत आहेत. तर बेलारुसमध्ये रशियन अण्वस्त्रs तैनात करण्यामागे ब्रिटनकडून युक्रेनला आर्मर पियर्सिंग शेल उपलब्ध करण्याची पार्श्वभूमी कारणीभूत आहे. आर्मर पियर्सिंग शेलमध्ये यूरेनियम असल्याचा दावा पुतीन यांनी केला होता. अमेरिकेने अनेक दशकांपासून बेल्जियम, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि तुर्कियेत अण्वस्त्रs तैनात केली आहेत. रशियाचे हे पाऊल अण्वस्त्रांशी निगडित कुठल्याही आंतरराष्ट्रीय कराराची अवहेलना करत नसल्याचा युक्तिवाद पुतीन यांनी केला होता.









