दिल्ली पोलिसांकडून न्यायालयाला विनंती, इतर आरोपांसंबंधी आरोपपत्र सादर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र सादर केले आहे. मात्र, त्यांच्या विरोधातील पोक्सो कायद्याअंतर्गत होणारी कारवाई स्थगित करावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. न्यायालयाने पोलिसांची ही मागणी मान्य केली तर, सिंग यांना मोठाच दिलासा मिळू शकणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.सिंग यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी शारीरिक शोषणाचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे त्यांना कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एका अल्पवयीन कुस्तीपटूनेही त्यांच्या विरोधात शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. पण ज्यावेळी ही कथित घटना घडली त्यावेळी ही महिला कुस्तीपटू अल्पवयीन नव्हती, असे स्पष्ट झाल्याने पोक्सो कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याचे कारण उरलेले नाही, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.
वडिलांचेच स्पष्टीकरण
या महिला कुस्तीपटूच्या वडिलांनीही ती अल्पवयीन नव्हती, असा खुलासा जाहीररित्या केला आहे. तिच्या जन्मदिनांकाचा घोळ झालेला होता. पण ती अल्पवयीन नव्हती. तसेच तिची ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नाही, असे स्पष्ट करणारे दुसरे सुधारित प्रतिज्ञापत्र या कुस्तीपटूने न्यायालयात सादर केले आहे. पहिल्या प्रतिज्ञापत्रात तिने हा आरोप केला होता. तथापि, आता तिने तिचे स्टेटमेंट बदलल्याने सत्य परिस्थिती समोर आली आहे. कागदपत्रांच्या तपासातही हीच स्थिती स्पष्ट झाल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.
न्यायालयाच्या हाती निर्णय
सिंग यांच्याविरोधात पोक्सो कायद्याच्या अंतर्गत प्रकरण चालणार की नाही, याचा निर्णय आता न्यायालयाने घ्यायचा आहे. न्यायालयाने पोक्सो कायदा लागू न करण्याचा निर्णय घेतल्यास सिंग यांच्यासाठी तो महत्वाचा दिलासा असेल. इतर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची सुनावणी केली जाणार आहे.
पुढील सुनावणी 4 जुलैला
दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र सादर करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजिंदर सिंग यांनी पोक्सो स्थगितीसंबंधीचा दिल्ली पोलिसांचा अहवाल नोंद करुन घेतला असून त्यावर पुढील सुनावणी 4 जुलैला ठेवली आहे. त्या दिवशी स्थिती स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसची टीका
पोक्सो कायद्याच्या अंतर्गत कारवाई करु नये या दिल्ली पोलिसांच्या सूचनेवर काँग्रेसने टीका केली आहे. ‘बेटी डराओ, ब्रिजभूषण बचाओ’ अशी भाजपची नवी घोषणा आहे, अशी खोचक टिप्पणी काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली. पोक्सोअंतर्गत कारवाई टाळून भाजप आरोपींना संरक्षण देत आहे. ब्रिजभूषण यांना ही संधी मिळता कामा नये, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
इतर आरोप अन्य न्यायालयात
इतर महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात केलेल्या आरोपासंबंधीचे आरोपपत्र रोझ अॅव्हेन्यू येथील न्यायालयात दिल्ली महानगर दंडाधिकारी दीपक कुमार यांच्यासमोर सादर करण्यात आले आहे. या आरोपपत्रावर सुनावणी करण्यासाठी 22 जून हा दिवस ठरविण्यात आला आहे. हे आरोपपत्र भारतीय दंड विधान अनुच्छेद 354 (विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळाचा उपयोग करणे), अनुच्छेद 354 अ (लैंगिक छळ), अनुच्छेद 354 ड (महिलेचा पाठलाग करणे) आणि अनुच्छेद 506 (गुन्हेगारी स्वरुपाचा धाक दाखविणे) या अनुच्छेदांखाली सादर करण्यात आले आहे. भारतीय कुस्ती संघटनेचे निलंबित साहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्या विरोधातही भारतीय दंड विधान अनुच्छेद 109 (गुन्हा करण्यास साहाय्य करणे) अंतर्गत आरोपपत्र सादर करण्यात आले.









