खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने लहान मोठे अपघात
सांबरा : शिंदोळी क्रॉस ते बसरीकट्टीपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून वाहनचालकांना दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधीनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या या रस्त्याची सध्या अत्यंत दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत व त्यामध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने वाहनचालकांना लगेच खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने लहान मोठे अपघातही घडत आहेत. बसरीकट्टी येथून दररोज कामानिमित्त व शिक्षणासाठी बेळगावला येणाऱ्या नोकरदारवर्ग व विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्यांना नियोजित ठिकाणी वेळेवर पोहोचणे कठीण जात आहे. तर अनेकवेळा वाहनेही नादुरुस्त होत असल्याने वाहनचालकांना हा एक डोकेदुखीचा विषय बनला आहे. याबाबत अनेकवेळा ग्रामस्थांनी आवाज उठविला. मात्र तरीही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. साधारण 15 ते 20 दिवसापूर्वी रस्त्यावर काही ठिकाणी पॅचवर्क करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे व सततच्या पावसामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.









