मुंगेत्री नदीच्या पुलांची अवस्था : नवीन पूल नियोजनबद्धरीत्या बांधले नसल्याच्या तक्रारी : संबंधित खात्याने लक्ष देण्याची मागणी
वार्ताहर /किणये
संतिबस्तवाड मुंगेत्री नदीवरील जुना व नवीन पूल नदीच्या पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत. संतिबस्तवाड येथील जुना पूल दरवर्षीच पाण्याखाली जात असतो. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपूर्वी नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र सदर पुलाची उंची वाढवण्यात आली नाही. त्याचे कामकाज योग्य पद्धतीने झाले नाही, अशा तक्रारी भागातील नागरिकांतून होत आहेत. संतिबस्तवाड गावाकडे दोन रस्ते जातात. जुना रस्ता व्हीटीयूकडून जातो. हाच रस्ता संतिबस्तवाड गावाला जात होता. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाची निर्मिती झाल्यानंतर गावकऱ्यांसाठी हा रस्ता बंद करण्यात आला. व त्यानंतर नर्सरीच्या बाजूने नवीन रस्ता संतिबस्तवाड गावाकडे जाण्यासाठी बनविण्यात आला. अधिक तर वाहतूकही या नवीन रस्त्यावरूनच संतिबस्तवाड गावाकडे होत आहे. जुन्या पुलावर मुंगेत्री नदीचे गेल्यावर्षापासून पाणी येते. त्याच्या बाजूलाच नवीन पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र सदर पुलाचे कामही नियोजनानुसार करण्यात आले नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
2019 साली घडली होती दुर्घटना
2019 साली या नदीला महापूर आल्यामुळे कारगाडी वाहून गेली होती. यामध्ये एका इसमाचा मृत्यू झाला होता. किणये-संतिबस्तवाड भागातील मुंगेत्री ही एकमेव नदी आहे. या भागातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून बरेच शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात एक-दोन जनावरे आहेत. या जनावरांसाठी मुंगेत्री नदीचा उपयोग बऱ्याच प्रमाणात चांगला होत आहे. शेतशिवाराकडे जाणाऱ्या बळीराजासह जनावरांनाही जुन्या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. जुन्या रस्त्यावरून वाहतूक करण्यासाठी नवीन बांधण्यात आलेल्या पुलाची उंची वाढवण्याची नितांत गरज होती. मात्र संबंधित खात्याने घाईगडबडीत सदर कामकाज केले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
उंची वाढवून पूल बांधण्याची आवश्यकता- नागेंद्र माळी
मुंगेत्री नदीच्या पूर्वीच्या रस्त्यावरील जुना पूल धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळेच याच पुलाच्या बाजूला नव्याने पूल बांधण्यात आलेले आहे. मात्र गेल्या दोन वर्षभरात या नवीन पुलावरही पाणी आलेले आहे. त्यामुळे हा नवीन पूल बांधूनही निरर्थक ठरू लागला आहे. वास्तविक या पुलाची उंची वाढवून हा पूल बांधण्याची आवश्यकता आहे. कारण नवीन पुलाच्या ठिकाणी उन्हाळ्यात नदीचे पाणी अडविण्याची गरज आहे. या ठिकाणी पाणी अडविल्यास त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होऊ शकतो.









