खानापूर : खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्याच्या भविष्याची दूरदृष्टी ठेवून विकासात्मक दृष्टिकोनातून तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यात शेती, औद्योगिक यासह विविध पातळीवर खानापूरचा कायापालट करण्यासाठी सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावेत. खानापूर वकील संघटना आपल्याबरोबर कायम राहील, असे उद्गार अॅड. आय. आर. घाडी यांनी काढले. खानापूर वकील संघटनेच्यावतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी वकील संघटनेच्यावतीने वकील संघटनेच्या सभागृहात आमदार विठ्ठल हलगेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून आमदारांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, तालुक्यातील जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे, त्याला तडा जावू देणार नाही. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. यासाठी आपल्यासारख्या उच्चशिक्षित वकील, डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक, शिक्षक यांचे कायम मार्गदर्शन व सल्ले घेऊनच कार्य करणार आहे. यासाठी वेळोवेळी विकासासंदर्भात चर्चा करणार आहे. याप्रसंगी अॅड. सुरेश लोटुलकर, अॅड. केशव कळळेकर, अॅड. आर. एम. हिरेमठ, अॅड. चेतन मणेरीकर यांनी विचार मांडले.b यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. आय. आर. घाडी, अॅड. एच. एन. देसाई, अॅड. जी. जी. पाटील, अॅड. अनंत देसाई, अॅड. सुरेश भोसले, अॅड. चेतन मणेरीकर, अॅड. केशव कळळेकर, अॅड. अरुण सरदेसाई, अॅड. जी. एम. देसाई, अॅड. विनायक सुतार, अॅड. मारुती कदम, अॅड. एम. ए. पाटील आदींसह अनेक वकील उपस्थित होते.









