जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिलेली माहिती, फातोर्डात 50 लाखांच्या दोन कामांना प्रारंभ
मडगाव : राज्यात शेतीचे प्रमाण पुन्हा वाढावे यासाठी सरकार कार्यरत असून त्यासाठी 50 कोटी रु. खर्चून राज्यातील 150 तळी पुनरुज्जीवित करण्यात येत असल्याची माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. फातोर्डा येथील दवंडे तळ्याचा गाळ उपसण्याच्या आणि भिंत उभारण्याच्या कामाचा त्यांनी शुभारंभ केला. यावेळी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि अन्य नगरसेवक उपस्थित होते. या मतदारसंघात 50 लाख खर्चाची ही दोन कामे हातात घेण्यात आली असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. गोवा सरकारच्या योजनांबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, 150 तळ्यांचे पुनरुज्जीविन करण्यासाठी यंदा 50 ते 60 कोटी रु. खर्च केले जाणार आहेत. बोरी येथील नवदुर्गा तळीवर सुमारे 3 कोटी, करमळी तळीवर सुमारे 2.5 कोटी, तर मायमोळे-वास्को येथील तळीवर 1.5 कोटी रु. खर्च केले जाणार आहेत. फातोर्डा मतदारसंघात पाच विहिरी उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही शिरोडकर यांनी दिली. यावेळी बोलताना सरदेसाई यांनी फातोर्डा मतदारसघांत जलस्रोत खात्याने कामे हाती घेतल्याबद्दल मंत्री शिरोडकर यांचे आभार मानले आणि शेतकऱ्यांना पोषक असे उपक्रम सरकारने हाती घ्यावेत, असे आवाहन केले.









