कचरावाहू वाहनांसह चौघांना पकडले
धारबांदोडा : धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणाऱ्या चौघांना स्थानिक युवकांनी पकडले आहे. याप्रकरणी धारबांदोड पंचायतने कडक भूमिका घेत रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी टाकलेल्या कचरा उचलण्यास त्या चौघांना भाग पडले. सरपंच विनायक गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी चौघेजण गाडीने आणलेला कचरा रस्त्याच्या बाजूला टाकून फळ काढत असल्याचे स्थानिक युवकांना समजल्यानंतर त्यांनी सरपंचाना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पंचायतीने गाडीसह विशाल गोसावी, सागर गोसावी, मयुर गोसावी व अश्विन गोसावी या चौघांना ताब्यात घेऊन कचरा उचलण्यास भाग पडले. सध्या राष्ट्रीय महामार्ग व इतर ठिकाणी रात्रीच्यावेळी कचरा टाकण्याचे प्रकार आहेत. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल असा ईशारा सरपंच विनायक गावस यांनी दिला आहे. पंचायत आपल्या क्षेत्रातील कचरा गोळा करीत आहे, मात्र बाहेरील कचरा आणून पंचायत क्षेत्रात टाकत असल्यामुळे पंचायतीचे नाव खराब होत आहे. नागरिकांनी जागृत राहून अशा लोकांवर पाळत ठेवावी व कोणी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास पंचयातीकडे संपर्क साधावा असे आवाहन सरपंच विनायक गावकऱ्यांनी केली आहे.









