सभापती रमेश तवडकर यांनी दिलेली माहिती, पैंगीण येथे कीर्तन प्रशिक्षण शिबिर
काणकोण : कीर्तन हे समाजाला शिक्षित करण्याचे आणि समाजप्रबोधनाचे उत्तम साधन असून आदर्श युवा संघाच्या पुढील लोकोत्सवात एक दिवस खास कीर्तनासाठी राखून ठेवला जाईल, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगिले. गोमंतक संत मंडळ कीर्तन विद्यालय आणि महालवाडा, पैंगीण येथील श्री नृसिंह परशुराम देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री नृसिंह परशुराम मंदिरात आयोजिण्यात आलेल्या दोन दिवसांच्या कीर्तन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, उपसरपंच सुनील पैंगणकर, ज्येष्ठ पत्रकार अजित पैंगीणकर, श्री नृसिंह परशुराम देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानानंद प्रभुगावकर आणि ह. भ. प. सुहासबुवा वझे उपस्थित होते. या शिबिरात वझे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात 25 जणांचा सहभाग असून त्यात 98 टक्के मुली आहेत. सुशिक्षित म्हणजे सुसंस्कृत समाज नाही. जगात भारतासारखा देश नसून हिंदूसारखा धर्म नाही. देश महत्त्वाचा असून जात महत्त्वाची नाही. बहुजन समाजातूनही शेकडो कीर्तनकार सध्या तयार होत आहेत. यापुढे या तालुक्यात पाच दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येईल, असे वझे यांनी स्पष्ट केले.
बदलत्या परिस्थितीत आज पुराण, कीर्तनाकडे लोकांनी पाठ फिरविली आहे, अशी खंत व्यक्त करतानाच, नवीन पिढीला या कलेकडे आकर्षित करण्यासाठी कीर्तन प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात याबद्दल अजित पैंगीणकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. कीर्तनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची नाळ परत सांधण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल सुनील पैंगणकर यांनी समाधान व्यक्त केले. कीर्तन प्रशिक्षण शिबिरात बहुसंख्य मुलींचा समावेश असल्याबद्दल सरपंच सविता तवडकर यांनी कौतुक केले. महिलांनी देवाला नमस्कार करतानाच सावित्रीबाई फुलेंचे रोज स्मरण करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्ञानानंद प्रभुगावकर यांनी विधायक उपक्रमांसाठी देवस्थानचे सभागृह यापुढे देखील उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले. सुरुवातीला शिबिरात सहभागी झालेल्या मुलींनी कीर्तन, नमन सादर केले. सूत्रसंचालन दामोदर कामत यांनी केले. अमिता पै खोत यांनी आभार मानले. या शिबिरात सत्संग, पाठ, नामस्मरण, प्रभातफेरी यांचा समावेश राहून दुसऱ्या दिवशी श्री नृसिंह परशुराम देवस्थान ते श्री नवदुर्गा देवस्थानापर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. त्यात शिबिरार्थींबरोबर स्थानिक देखील सहभागी झाले. गोमंतक संत मंडळाने खास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर कीर्तन तयार केले असून या विद्यालयातील मुले मराठी, हिंदी, इंग्रजीतून कीर्तने सादर करत असतात, अशी माहिती यावेळी वझे यांनी दिली.









