प्रतिनिधी / डिचोली.
युवाशक्तीने ठासून भरलेल्या या भारत देशातील युवांच्या शक्तीचा योग्य वापर करताना या देशाला महासत्ता व विश्वगुरू बनविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आहे. या संकल्पाला साथ देताना या भारताची एकता राखून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या देशाच्या इतिहासाचा व आपल्याला या देशाकडून मिळालेला वारसा यांचा आपण आदर राखणे महत्वाचे आहे. देश प्रथम हि भावना प्रत्येक युवा युवतीने मनामध्ये जागृत करून पंचसूत्रींचा अवलंब करावा. सशक्त भारत निर्मितीचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी डिचोलीत केले.
नेहरू युवा केंद्र, क्रीडा व युवा व्यवहार खाते भारत सरकार झांट्यो महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत एक दिवशीय युवा महोत्सवात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ, प्राचार्य राजेंद्र कुंभारजुवेकर, डॉ. नितीन सावंत, प्रकाश मनुरे आदी उपस्थित होते.
आगामी पंचवीस वर्षांच्या भारताच्या विकासाची वाटचाल कशी असावी त्यासाठी युवकांनी एकता अखंडता टिकवून ठेवणे, तसेच गुलामगिरीची मानसिकता बदलून आम्ही स्वयंपूर्ण भारतीय आहोत हि संकल्पना ऊजवणे, व विकसित भारत क्लीन इंडिया व सशक्त भारत यासाठी पंचसुत्रीचा अवलंब करून युवकांना योग्य दिशा देणे. त्यांची शक्ती विधायक कार्यसाठी उपलब्ध करणे यासाठी हे युवा महोत्सव राज्य व देशपातळीवर होत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी भारत आज महासत्ताकच्या दिशेने वाटचाल करीत असून आगामी काळात युवकांची शक्ती खुप कामाला येणार आहे. राष्ट्रीय एकात्मता व विविधतेतूनही एकता यासाठी युवा शक्तीने विधायक कार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले. भारतीय परंपरा विचारधारा व संपन्न संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी युवा शक्तीची आहे. जगाला संस्कृती व संस्कार देण्याचे काम भारत करीत असून पंतप्रधान मोदीजी यांनी जगात भारताची प्रतिमा महान केली आहे. या पुढे युवकांनी देशाची प्रगती कशी साधावी, यासाठी युवा शक्तीला संघटित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य राजेंद्र कुंभारजुवेकर यांनी युवा शक्तीच्या हातात भावी भारत घडवण्याची शक्ती असून तिचा विधायक कार्यासाठी वापर व्हावा व देश बलशाली व्हावा हा उद्देश असल्याचे संगितले.
कालिदास घाटवळ यांनी स्वागतपर भाषणात युवा महोत्सवाचा हेतू विशद केला. दिवसभर अनेक स्पर्धा व कार्यक्रम झाले. त्याला मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी युवा पुरस्कार विजेते गुणाजी मांद्रेकर यांचा तसेच श्रीपाद नाईक, राजेंद्र कुंभारजुवेकर यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले. कात्यायनी घाटवळ हिने सुत्रसंचालन केले तर डॉ. प्रवीण सावंत यांनी आभार मानले.









