सेन्सेक्समध्ये 317 अंकांची वाढ : गुंतवणूकदारांचे 98 हजार कोटी वाढलेगुंतवणूकदारांचे 98 हजार कोटी वाढले
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकाने चांगली तेजी राखत गुंतवणूकदारांना मालामाल करुन सोडले आहे. एकाच दिवसात 98 हजार कोटी गुंतवणूकदारांचे वाढले आहेत.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 317 अंकांच्या वाढीसह 62,345 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 84 अंकांच्या तेजीसह 18398 अंकांवर बंद झाल्याचा पाहायला मिळाला. रियल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये सोमवारी सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली. याशिवाय एफएमसीजी, टेलिकॉम, टेक, आयटी आणि ऑटो क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसह बंद झालेले पाहायला मिळाले. युटिलीटी आणि ऊर्जा क्षेत्राच्या निर्देशांकातील समभागांमध्ये घसरण दिसून आली. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकदेखील अनुक्रमे 0.47 टक्के, 0.49 टक्के तेजीत होते.
बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 15 मे रोजी 278.60 लाख कोटीवर पोहचले होते. 12 मे रोजी 277.70 लाख कोटी रुपये इतके भांडवल राहिले होते. याचाच अर्थ सोमवारी लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 98 हजार कोटी रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक पाच महिन्यांच्या उच्चांकावर बंद झालेले पाहायला मिळाले. रियल्टी, एफएमसीजी, बँकिंग समभागांमध्ये खरेदी दिसून आली. हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, आयटीसी, टेक महिंद्रा आणि एचयुएल यांचे समभाग तेजीसह बंद झाले. अदानी एंटरप्रायझेस, सिप्ला, बीपीसीएल, डिव्हीज
लॅब्ज आणि ग्रेसीम इंडस्ट्रिज यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. रियल्टी निर्देशांक सर्वाधिक 5 टक्के वाढत तर एफएमसीजी निर्देशांक 1 टक्का वधारत बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 22 समभागांमध्ये खरेदी राहिली तर निफ्टीतील 50 पैकी 35 समभागांमध्ये खरेदी पाहायला मिळाली.
अमेरिकेतील बाजार घसरणीत
जागतिक बाजारांमध्ये अमेरिकेतील बाजार मात्र घसरणीत होते. डोव्ह जोन्स 8 अंकांनी तर नॅसडॅक 43 अंकांनी घसरणीत होता. युरोपियन बाजार तेजीत होते. आशियाई बाजारात उत्साह होता, ज्यात निक्की 238, हँगसेंग 343, कोस्पी 3 आणि शांघाई कम्पोझीट 38 अंकांनी वधारत व्यवहार करत होता.









