भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा मोठा निर्णय; 45 दिवसांत निवडणुका होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन सुरू असतानाच भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवले आहे. आयओएचे सहसचिव कल्याण चौबे यांनी कुस्ती संघटनेला आदेश जारी करून सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय, आर्थिक कामांवर बंदी घातली आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका रद्द करून आयओएच्या तात्पुरत्या समितीकडे निवडणुकांचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपवल्यानंतर आयओएने हे पाऊल उचलले आहे. ‘आयओए’ने कुस्ती असोसिएशनला सर्व दस्तावेज, खाती आणि परदेशी टूर्नामेंट प्रवेशासाठी आवश्यक वेबसाईट लॉगिन त्वरित सुपूर्द करण्यास सांगितले आहे.
‘आयओए’ने कुस्ती संघटना चालवण्यासाठी आणि 45 दिवसांच्या आत निवडणुका घेण्यासाठी 3 मे रोजी तीन सदस्यीय तात्पुरती समिती स्थापन केली. या समितीमध्ये वुशू फेडरेशनचे भूपेंद्र सिंग बाजवा, ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरूर आणि निवृत्त न्यायाधीश यांचा समावेश आहे.
कुस्तीपटूंवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांनी घेरलेले ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ‘डब्ल्यूएफआय’चे अध्यक्ष म्हणून 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. क्रीडा संहितेनुसार त्यांना आता या पदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. जानेवारीमध्ये कुस्तीपटूंच्या पहिल्या आंदोलनावेळी ब्रिजभूषण यांना महासंघाच्या सर्व उपक्रमांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले होते. दुसरीकडे ब्रिजभूषण यांनीही आपण अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.









