महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत जोरदार चर्चा
बेळगाव : महापालिकेमध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचारी दहा ते पंधरा वर्षांपासून ठाण मांडून आहेत. त्यांची बदली का झाली नाही? याचे कारण काय? असा प्रश्न नगरसेवक शंकर पाटील यांनी केला. त्यावर सभागृहामध्ये जोरदार चर्चा झाली. शुक्रवारी महापालिकेची पहिली सर्वसाधारण बैठक झाली. त्यामध्ये अनेक वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत तातडीने निर्णय घेऊन सरकारकडे बदलीसाठी प्रस्ताव पाठविण्याचा ठरावदेखील करण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक शंकर पाटील यांनी सरकारी आदेशदेखील सभागृहात वाचून दाखविला. ए व बी ग्रुपच्या अधिकाऱ्यांना तीन वर्षेच एका ठिकाणी राहता येते. त्यानंतर त्यांची बदली करणे हे कायद्यातच आहे. त्याचबरोबर सी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना 5 वर्षे तर डी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना 7 वर्षे काम करता येते. त्यानंतर त्यांची नियमानुसार बदली झाली पाहिजे. मात्र गेली अनेक वर्षे ते एकाच ठिकाणी आहेत. तेव्हा तातडीने त्यांची बदली करण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी केली.
सध्या असलेले काही अधिकारी व कर्मचारी नगरसेवकांनाही काहीच किंमत देत नाहीत. अशा तक्रारी नगरसेवकांनी केल्या. त्यावर जोरदार चर्चादेखील झाली. विरोधी पक्षातील नगरसेवक अजीम पटवेगार आणि मुज्जमील डोणी यांनी काही अधिकारी व कर्मचारी प्रामाणिक आहेत. त्यांना वगळूनच उद्धट असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी केली. याबाबत जोरदार आक्षेप काहीजणांनी नोंदविला. त्यानंतर महापालिकेमध्ये ठराव करून सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे अधिकाऱ्यांमध्ये मात्र खळबळ उडाली होती. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनीही बदली न झाल्याबाबत काही उत्तरे दिली. मात्र नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सरकारकडे पाठपुरावा करून संबंधितांची बदली करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीच्या बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासमोरदेखील सर्वसामान्य जनतेने अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी नोंदविल्या होत्या. त्यामुळे त्यांची इतरत्र बदली करावी, अशी मागणी रेटून धरण्यात आली आहे.
कंत्राटदार जोगीन यांच्याविरोधात नगरसेवकांची तक्रार
शहरातील डेकोरेट पोल व भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचा ठेका कंत्राटदार जोगीन यांना देण्यात आला होता. त्यांचे काम पूर्णपणे निकृष्ट झाले असून त्यांना सभागृहात बोलावून कामाच्या दर्जाबाबत विचारणा करावी, असा प्रश्न नगरसेवक रवी साळुंखे यांनी सभागृहात केला. त्यावेळी सत्ताधारी पक्षातील एका नगरसेवकाने विरोध केला. मात्र महापालिका आयुक्तांनी कोणत्याही कंत्राटदाराला सभागृहात बोलविता येते. तेव्हा निश्चितच त्या कंत्राटदाराला बोलावून कामाच्या दर्जाबाबत विचारणा केली जाईल, असे आश्वासन दिले. शुक्रवारी सर्वसाधारण बैठक महापालिकेच्या सत्रात पार पडली. दुपारच्या सत्रामध्ये शहापूर येथील डेकोरेट पोल तसेच भूमिगत वीज वाहिन्या घालण्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न मांडला. त्यावेळी अनेक नगरसेवकांनी त्या कंत्राटदाराविरोधात तक्रारी नोंदविल्या आहेत. जोगीन या कंत्राटदाराने केलेले काम हे अत्यंत दर्जाहीन आहे. तेव्हा त्याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी स्पष्ट केले. रेल्वे ओव्हरब्रिज ते गोवावेसपर्यंत एलअॅण्डटी कंपनीने पाईपसाठी केलेली खोदाई योग्य प्रकारे बुजविली नाही. त्यामुळे वाहने अडकत आहेत. याचबरोबर त्या ठिकाणी चिखलदेखील होत आहे. तेव्हा त्याची तातडीनेदुरुस्ती करावी, अशी मागणी देखील रवी साळुंखे यांनी केली. त्यानंतर सभागृहामध्ये महसूल गोळा करणे याचबरोबर अर्थसंकल्पाबाबत जोरदार चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नगरसेवकांनी आपला सहभाग दर्शविला होता.









