पर्यटकांना धबधब्यांवर जाण्यासही मनाई
बेळगाव : संततधार पावसामुळे खानापूर तालुक्यात शनिवार दि. 22 जुलै रोजी शाळांना सुटी देण्यात आली आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांना एक दिवस सुटी जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून खानापूर तालुक्यात संततधार सुरू आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून शनिवारी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी देण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. याबरोबरच चिखले, पारवाड व चिगुळे येथील धबधबे वगळता इतर धबधब्यांना नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून धबधब्यांना जाणाऱ्या वाटा बंद करण्यात आल्या आहेत.









