24 तासांत जिल्ह्यात 26 मि.मी. : खानापूर तालुक्यात सर्वाधिक
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस कोसळला. बुधवार, गुऊवार दिवसभर पाऊस पडला. त्यानंतर शुक्रवारी मात्र सकाळच्या सत्रामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारनंतर मात्र पावसाने काहीशी उसंत घेतली होती. गेल्या 24 तासांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने 26 मि. मी. ची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस खानापूर तालुक्यात झाला असून 87 मि.मी.ची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी मुडलगी तालुक्यात 4 मि. मी. पाऊस झाला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाला सुऊवात झाली होती. दुपारी 12 पर्यंत पाऊस कोसळला. त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले होते. गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे काहीसे जनजीवन विस्कळीत झाले होते. पाऊस झाल्याने साऱ्यांनाच दिलासा मिळाला असला तरी अजूनही दोन दिवस दमदार पावसाची गरज होती, असे शेतकरी सांगत आहेत.
बेळगाव शहर व तालुक्यामध्ये पाऊस बऱ्यापैकी झाला असून 24 तासांत 52 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरामध्ये तसेच तालुक्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीही पूर्ण क्षमतेने वाहत आहे. दरवर्षीप्रमाणे बळ्ळारी नाल्याला पुन्हा पूर आला आहे. त्यामुळे शेकडो एकर जमिनीतील भात पीक कुजून जाण्याची भीती पुन्हा व्यक्त होत आहे. या पावसामुळे वडगाव येथील अन्नपूर्णेश्वरीनगर परिसरातही पाणी तुंबून आहे. ड्रेनेज व पावसाचे पाणी पूर्ण रस्त्यावरून वाहत असून ते पाणी काही शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये शिरले आहे. याचबरोबर त्या ठिकाणी भगदाडही पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बळ्ळारी नाल्याला पुन्हा पूर आला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षीही फटका बसला आहे. बळ्ळारी नाल्याजवळ पाणी साचले तरी अजून येळ्ळूर, धामणे तसेच इतर परिसरातील शिवारात पाणी साचले नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना अजूनही पावसाची गरज आहे. सध्या पावसामुळे पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले तरी शिवारामध्ये पाणी साचून राहणे गरजेचे आहे. त्यामुळे अजूनही काही दिवस पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
अजूनही पावसाची गरज
शुक्रवारी सायंकाळी पुन्हा काही प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. मात्र पावसाला म्हणावा तसा जोर नसल्याचे दिसून आले. या पावसामुळे नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. याचबरोबर जलाशयांमध्ये पाणीसाठाही वाढत आहे. मात्र जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही काही दिवस पावसाची गरज आहे.
राकसकोप जलाशयात साडेतीन फुटाने वाढ
तुडये : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जालशय परिसरात शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने जलाशयाची एकूण पाणीपातळी साडे पंधरा फुटाने वाढली आहे. गुरुवार सकाळपासून शुक्रवारी सकाळपर्यंत साडेतीन फूट पाणीपातळी वाढली आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पाणीपातळी 2464 फूट झाली आहे. जलाशय पूर्ण पातळीने भरण्यासाठी आता आकरा फूट पाण्याची आवश्यक आहे.









