वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूची निवड केली जाते. ही निवड करताना क्रिकेटपटूंच्या महिनाभरातील कामगिरीचा आढावा घेतला जातो. आता मार्च महिन्यासाठी न्यूझीलंडचा केन विलियम्सन, बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन तसेच संयुक्त अरब अमिरातचा असीफ खान यांची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सनला गेल्dया दोन वर्षांच्या कालावधीत कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडावे लागले होते. पण लंकेविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विलियम्सनला फलंदाजीचा सूर मिळाल्याचे जाणवले. या मालिकेत त्याने तीन डावात 1 द्विशतक आणि 1 शतक झळकविले. 32 वर्षीय विलियम्सनचे कसोटी क्रिकेटमधील हे सहावे द्विशतक असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकविणाऱ्या लंकेचा अट्टापटू, भारताचा विरेंद्र सेहवाग, पाकचा जावेद मियाँदाद आणि युनुस खान, ऑस्ट्रेलियाचा पाँटिंग व भारताचा सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. लंकेविरुद्धच्या मालिकेत विलियम्सनची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली होती.
बांगलादेशचा अष्टपैलू कर्णधार शकीब अल हसन याची मार्च महिन्यातील झालेल्या विविध सामन्यातील कामगिरी दर्जेदार झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शकीब अल हसनने 2 अर्धशतकांसह तीन सामन्यात 141 धावा जमविल्या असून त्याने या मालिकेत 6 गडी बाद केले आहेत. या कामगिरीमुळे बांगलादेशने इंग्लंडचा या मालिकेत पराभव केला. त्यानंतर बांगलादेशने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही दर्जेदार कामगिरी करत इंग्लंडचा 3-0 असा व्हाईटवॉश केला. तसेच आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शकीबने 93 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. तसेच आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 36 वर्षीय शकीब अल हसनने 24 चेंडूत नाबाद 38 धावा जमविल्या. तसेच त्याने पॉवर प्ले दरम्यान आयर्लंडचे 5 गडी बाद केले. मार्च महिन्यात शकीब अल हसनने आपल्या अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविताना फलंदाजीत 12 सामन्यात 353 तसेच गोलंदाजीत 15 गडी बाद केले आहेत. संयुक्त अरब अमिरातच्या असीफ खानने आयसीसीच्या पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट लीग-2 मधील अंतिम टप्प्यात आक्रमक फलंदाजी केल्याने संयुक्त अरब अमिरातचा संघ आता 2023 च्या भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या पात्रतेच्या स्पर्धेत असीफ खानने 2 अर्धशतके नेपाळ संघाविरुद्ध नोंदविली. तसेच त्यानंतर असीफ खानने नेपाळविरुद्धच्या वनडे सामन्यात 42 चेंडूत नाबाद 101 धावा फटकाविल्या. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये वनडे प्रकारात जलद शतक नोंदविणारा असीफ खान हा चौथा फलंदाज आहे.









