वृत्तसंस्था/ चार्ल्सस्टन (अमेरिका)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या महिलांच्या चार्ल्सस्टन खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेची मॅडिसन कीज आणि दारिया कॅसात्किना यांच्यात एकेरीची उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे.

या स्पर्धेतील झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मॅडिसन कीजने पोलंडच्या लिनेटचा तर कॅसात्किनाने अमेरिकेच्या पेराचा पराभव केला. नवव्या मानांकित मॅडिसन कीजने आठव्या मानांकित लिनेटचा 6-2, 3-6, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. अलीकडच्या कालावधीत मॅडिसन कीजने एकेरीचे सलग 20 सामने जिंकले आहेत. 2019 साली मॅडिसन कीजने चार्ल्सस्टन स्पर्धा जिंकली होती. दुसऱ्या एका सामन्यात कॅसात्किनाने अमेरिकेच्या पेराचा 6-3, 7-6 (7-3) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 2017 साली कॅसात्किनाने चार्ल्सस्टन स्पर्धा जिंकली होती.









