चुकीचे वेळापत्रक प्रसार माध्यमांवर व्हायरल
प्रतिनिधी /बेळगाव
राणी चनम्मा विद्यापीठ (आरसीयू) च्या पदवी परीक्षा 20 सप्टेंबरपासूनच होणार आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची चुकीची माहिती प्रसारमाध्यमांवर दिली जात आहे. तसेच जुने वेळापत्रक पाठविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ करून न घेता परीक्षेची तयारी करावी, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी दिली.
मागीलवषी कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु यावषी सुरळीत पद्धतीने कॉलेज सुरू असल्याने दिलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार आहेत. 20 सप्टेंबरपासून पदवी तर 21 सप्टेंबरपासून पदव्युत्तर परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. परंतु मागील दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांवर खोटे परिपत्रक पाठविले जात आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून 28 पासून परीक्षा होणार असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. परंतु हे वृत्त चुकीचे असून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा होणार आहे. तसेच चुकीची माहिती पसरविणाऱया व्यक्तींवर पोलिसांकडे तक्रार केली जाणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजशी अथवा विद्यापीठाशी संपर्क साधावयाचा आहे.









