नूतनीकरणाचे काम 90 टक्के पूर्ण : महिनाअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण केले जात आहे. विमानतळाच्या टर्मिनलप्रमाणे रेल्वेस्थानकाला नवे स्वरुप देण्यात येत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत नूतनीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी सूचना खासदार मंगला अंगडी यांनी रेल्वेच्या अधिकाऱयांना केली.
खासदार मंगला अंगडी यांनी सोमवारी सायंकाळी रेल्वेस्थानकाच्या बांधकामाचा आढावा घेतला. रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेली तीन मजली इमारत, पार्किंगची व्यवस्था, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 4, कोचिंग डेपो, दक्षिण दिशेचे प्रवेशद्वार या सर्वांचा त्यांनी आढावा घेतला. नूतनीकरणाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सप्टेंबरअखेरपर्यंत काम पूर्णत्वाला न्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी हुबळी विभागीय अधिकारी संतोषकुमार वर्मा, अतिरिक्त सरव्यवस्थापक अरुणकुमार यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.









