वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अल्बेनियातील ड्युरेस येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या विश्व युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतील पहिल्याच दिवशी भारताने 2 कांस्यपदके मिळवली. भारताच्या धनुष लोगनाथन आणि जोश्ना साबर यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक मिळवले.
महिलांच्या 40 किलो वजन गटात भारताची वेटलिफ्टर 14 वर्षीय जोश्नाने स्नॅचमध्ये 53 तर क्लिन आणि जर्कमध्ये 62 असे एकूण 115 किलो वजन उचलत कांस्यपदक पटकावले. जोश्नाने या क्रीडा प्रकारात स्नॅचमध्ये रौप्यपदक घेतले पण तिला क्लिन आणि जर्क विभागात सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 49 किलो वजनगटातून धनुष लोगनाथनने स्नॅचमध्ये 88 तर क्लिन आणि जर्कमध्ये 112 असे एकूण 200 किलो वजन उचलत तिसऱ्या स्थानासह कांस्यपदक मिळवले. या गटात प्रिन्स डिलॉस सॅन्टोसने सुवर्णपदक तर बोरेसने रौप्यपदक मिळवले. या स्पर्धेमध्ये स्नॅच तसेच क्लिन आणि जर्क या प्रकारात आयोजकांकडून स्वतंत्र पदके वितरीत केली जात आहेत. मात्र ऑलिम्पिक स्पर्धेत क्लिन, जर्क तसेच स्नॅच या तिन्ही प्रकारात एकच पदक दिले जाते.









