पुणे / प्रतिनिधी :
अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमध्ये वाढ झाल्याने पुणे, मुंबई, सातारा, कोकणासह राज्याच्या अनेक भागाला शुक्रवारी पावसाने झोडपून काढले. गुरुवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस होत असून, शुक्रवारी दिवसभर या पावसाचे थैमान सुरुच होते. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा मारा सुरूच राहणार असून, शनिवारी पालघर, रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, पुणे, साताऱ्यातील घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा आहे. विदर्भाच्या अनेक भागांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य प्रदेश व लगतच्या भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तर प्रदेशच्या मध्यभागी असून, या क्षेत्राला अरबी समुद्राकडून मोठय़ा प्रमाणात बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होत आहे. हे वारे महाराष्ट्र, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारी दिवसभर पावसाने राज्याला झोडपून काढले. नाशिक, पुणे, पालघर, ठाणे, रायगड, मुंबईच्या अनेक भागाला मुसळधार पावसाचा मारा झाला. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठले, तर सततच्या पावसामुळे वाहतूकही मंद गतीने सुरू होती.
पुण्यात संततधार; खडकवासला, पवना धरणातून विसर्ग सुरू
पुणे, पिंपरी-चिंचवड, उपनगर व जिल्हय़ांत शुक्रवारी पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे शहर व परिसरातील रस्ते जलमय झाले. अनेक भागांत पाणी साचले. पावसाच्या या संततधारेमुळे जिल्हय़ातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून, खडकवासला, मुळशी, पवना, चासकमान, कासारसाई आदी धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरणांतून दुपारी 22 हजार क्युसेक वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले असून, पुण्यातील भिडे पूल यंदाच्या पावसाळय़ात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला. तर पवना धरणातूनही 10 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर
पुण्याबरोबरच मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातही पावसाचा जोर दिसत आहे. ठाण्यामध्ये पावसाने दाणादाण उडविली असून, येथील जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसत आहे. सातारा, रायगडलामध्येही पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे.
पुढचे तीन ते चार दिवस पावसाचे सत्र कायम
पुढील तीन ते चार दिवस पावसाचे प्रमाण कायम राहणार असून, यात शनिवारी पालघर, रायगडला ऑरेंज अलर्ट तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्हय़ातील घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा आहे. विदर्भातही अनेक जिल्हय़ांत वादळी पावसाचा अंदाज आहे. यानंतर पुढील तीन दिवस विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हय़ात वादळी पाऊस, जोरदार वाऱयांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शेती व जनावरांबाबत काळजी घेण्याच्या सूचना
कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह व विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. हे पाहता शेतकऱ्यांनी जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. त्याचबरोबर कोकण व घाट भागांत खरीप पिके, भाजीपाला व फळबागांतून अतिरिक्त निचरा करण्यात यावा, असा कृषी सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे संकेत
20 सप्टेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राच्या निर्मितीचा अंदाज असून, यामुळे या भागात पावसाचे प्रमाण वाढणार आहे.








