प्रतिनिधी /बेळगाव
बसवेश्वर चौकातील मुख्य रस्त्यावर गतिरोधकाशेजारी पावसाचे पाणी साचून खड्डे निर्माण होत आहेत. धोकादायक खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल महापालिकेने घेतली असून गुरुवारी रात्री पेव्हर्स आणि चिपिंग घालून खड्डे बुजविण्यात आले. या ठिकाणी पावसामुळे दरवषी खड्डे निर्माण होत आहेत. त्याकरिता समस्येचे कायमस्वरुपी निवारण करावे, अशी मागणी होत आहे.
खानापूर रोडचे रुंदीकरण करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र बसवेश्वर चौकाशेजारी जलतरण तलाव परिसरात काँक्रिटीकरण न झालेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने कोणत्याच उपाययोजना राबविल्या नाहीत. परिणामी रस्त्यावर पाणी साचून खड्डे निर्माण होत आहेत. विशेषतः एलआयसी भवनसमोर बसथांब्याशेजारी दरवषी पावसामुळे खड्डे निर्माण होऊन अपघात घडत आहेत.
रस्त्याची दुरुस्ती केल्याने समाधान
या ठिकाणी रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनर्थ घडण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या समस्येबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला आहे. याची दखल घेऊन गुरुवारी रात्री या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी चिपिंग घालण्यात आले असून मोठय़ा खड्डय़ांमध्ये पेव्हर्स बसविण्यात आले. महापालिकेच्यावतीने या रस्त्याची दुरुस्ती केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









