उघडय़ा गटारींवर पडण्याचा धोका टाळण्यासाठी बॅरिकेड्स घालून दक्षता : संबंधित अधिकाऱयांना कधी जाग येणार?

प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध ठिकाणी खुल्या असलेल्या गटारी पादचारी आणि वाहनधारकांना धोकादायक बनल्या आहेत. गटारींवर झाकणे घालावीत, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. पण महापालिका प्रशासनाने याकडे नेहमी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे काही ठिकाणी गटारी झाकण्यासाठी चक्क बॅरिकेड्सचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
धोकादायक गटारींमुळे नागरिक अडचणीत आले आहेत. विशेषतः अरुंद रस्त्यांशेजारील गटारी पादचाऱयांना धोकादायक बनल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी गटारी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी गटारींची खोली 3 ते 5 फूट असल्याने लहान मुलांना अधिक धोका आहे. जिल्हा रुग्णालयासमोर उघडय़ा गटारींवर झाकण घालण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांना अडचण बनली होती. हा परिसर वर्दळीचा असून रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना नातेवाईकांची धावपळ होते. अशा वेळी गटारींमध्ये पडण्याच्या घटना घडल्या आहेत. याच ठिकाणी रिक्षास्थानक असल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या उघडय़ा गटारींवर बॅरिकेड्स घालून दक्षता घेण्यात आली आहे.
कॅम्प परिसरातील पोलीस क्वॉर्टर्सच्या मागील बाजूस असलेला रस्ता अरुंद आहे. खानापूर रोडला जोडणाऱया कॉर्नरवर दुतर्फा गटारी आहेत. यापैकी एक गटार मोठी असून, वाहने वळविताना अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत. शाळकरी मुले ये-जा करीत असताना एखादे वाहन आल्यास बाजूला सरकण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा वेळी तोल जाऊन गटारीमध्ये पडण्याचा धोका आहे. त्यामुळे या गटारीवर बॅरिकेड्स घालण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डने दुर्लक्ष केल्यानेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी गटारीवर बॅरिकेड्स घालण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱयांना कधी जाग येणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.









