मारियुपोलमध्ये चालविली कार ः लोकांशी साधला संवाद ः क्रीमियाचाही केला दौरा
वृत्तसंस्था / मारियुपोल
रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी पहिल्यांदाच युक्रेनचा दौरा केला आहे. रशियाच्या कब्जात असलेले मारियुपोल शहराचा दौरा त्यांनी रविवारी केला. पुतीन हे हेलिकॉप्टरने मारियुपोल शहरात पोहोचले. मारियुपोलमधील अनेक जिल्हय़ांमध्ये स्थानिक लोकांशी त्यांनी संवाद साधला आहे. नेवस्की जिल्हय़ात एका कुटंबाच्या घरी त्यांनी भेट दिली आहे. पुतीन यांच्या या दौऱयाप्रकरणी युक्रेनकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पुतीन यांनी युक्रेनमध्ये सैन्य मोहिमांची धुरा सांभाळणाऱया अधिकाऱयांची भेट घेतली. चीफ ऑफ जनरल स्टाफ वालेरी गेरासिमोव्ह यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे. पुतीन यांनी उपपंतप्रधान खुशुनिलिन यांच्यासोबत मारियुपोलच्या रस्त्यांवर कार देखील चालविली. पुतीन यांनी तेथील रस्त्यांना उत्तम संबोधिले आहे. लोक आता मारियुपोलमध्ये परतत असल्याचा दावा रशियाचे उपपंतप्रधान मरात खुशुनिलिन यांनी केला आहे.
मारियुपोलवर मे 2022 पासून रशियाच्या सैन्याचा कब्जा आहे. या शहरावर नियंत्रण मिणविण्यासाठी रशिया-युक्रेन यांच्यात भीषण संघर्ष झाला होता. मारियुपोलवर ताबा मिळवत रशियाने युद्धात पहिला विजय मिळविला होता. युद्धापूर्वी मारियुपोलमध्ये सुमारे 5 लाख लोकांचे वास्तव्य होते. तसेच येथे युरोपमधील सर्वात मोठ एझोवस्टल स्टील प्रकल्प देखील होता. मारियुपोल शहरावर कब्जा करताना रशियाच्या सैन्याने तेथे नरसंहार केल्याचा आरोप आहे. सुमारे 200 जणांचे मृतदेह सापडल्याचा दावा युक्रेनकडून मागील वर्षी करण्यात आला होता.
पुतीन यांनी शनिवारी रशियाच्या कब्जातील क्रीमियाचा दौरा केला होता. काळय़ा समुद्रातील या बेटावरील कब्जाला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ते येथे पोहोचले होते. सेवस्तोपोलच्या बंदर शहरालाही त्यांनी भेट दिली असल्याचे समजते. पुतीन यांनी क्रीमियामध्ये एका कलाशाळेचे उद्घाटन केले आहे. रशियाने 2014 मध्ये युक्रेनच्या क्रीमियावर एका कथित जनमत चाचणीच्या आधारावर कब्जा केला होता. रशियाच्या या पावलाला युक्रेन आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिली नव्हती.
पुतीन विरोधात अटक वॉरंट
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने शुक्रवारी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पुतीन हे युक्रेनमध्ये युद्धगुन्हेगार आहेत. युक्रेनियन मुलांचे अपहरण आणि स्थलांतराच्या गुन्हय़ासाठी ते जबाबदार आहेत असे न्यायालयाने म्हटले होते. तर रशियाने युद्धगुन्हय़ांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कायदेशीरदृष्टय़ा रशियासाठी या अटक वॉरंटला काडीचीही किंमत नाही. रशिया आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या रोम स्टॅटय़ूटचा हिस्सा नाही असे रयिशाच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोव्हा यांनी म्हटले आहे.
रशियाने कब्जा सोडून द्यावा
रशियाने क्रीमिया तसेच अन्य भागांवरील कब्जा सोडावा अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी केली आहे. रशियाने युपेनमधील दोन प्रांतांवर कब्जा करण्याच्या दृष्टीने संघर्ष कायम ठेवला आहे.









