अध्याय सविसावा
संगतीचा परिणाम किती भयंकर असतो हे समजावून सांगण्यासाठी भगवंत उद्धवाला पुरुरवा आणि उर्वशी यांची कथा सांगत आहेत. ते म्हणाले, एकदा उर्वशीला गर्व झाला आणि त्यामुळे ती गर्वाने फुगली. त्या नादात नाच करताना तिच्या हातून चूक झाली म्हणून ब्रह्मदेवाने दिलेल्या शापानुसार ती पृथ्वीवर आली. त्यापूर्वी तिने हात जोडून उःशाप मागितला. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले की, तू पुरूरव्याला निर्वस्त्र पाहिलेस की, पुन्हा स्वर्गात येशील.
उर्वशी मृत्युलोकी आली. तिच्या रूपाला पाहताच पुरूरवा राजा भुलून गेला. तिला आपल्या बरोबर राजमहालात यावे म्हणून तिची विनवणी करू लागला. तिने त्याच्यासमोर तिच्या अटी ठेवल्या त्यातील मुख्य अट अशी होती की, त्याला तिने निर्वस्त्र स्थितीत पाहिले तर ती त्याला सोडून निघून जाईल. ही तिची अट मान्य करून त्याने तिला आपल्या उपभोगार्थ आणली. तिने आपला शापाचा प्रभाव नाहीसा व्हावा म्हणून आपल्याबरोबर दोन मेंढे आणले होते. त्यांना मुलासारखे पाळले पाहिजे अशीही अट तिने राजाला घातली होती. राजाने तीही मान्य केली. उर्वशीला स्वर्गास न्यावी म्हणून चोरांनी ते दोन्ही मेंढे मध्यान्ह रात्री चोरून नेले. चोरून नेताना ते ‘ब्या ब्या’ करून ओरडू लागले. बोकडांचा आवाज ऐकून उर्वशी दुःखाने खडबडून उठली आणि दुःखाने कपाळ पिटू लागली. उर्वशीचा भयंकर शोक पाहून राजाने हातात शस्त्र घेतले आणि धावत धावत चोरांच्यामागे निघाला. धावताना त्याचा पीतांबर फाटला, परंतु त्याला त्याचे भान राहिले नाही. त्याने त्या चोरांचा पराभव करून त्या बोकडांना आणून उर्वशीपुढे उभे केले. इतक्मयांत एकदम मोठी वीज चमकली. त्या प्रकाशात उर्वशीने राजाला निर्वस्त्र पाहिले.
कराराचा भंग झाल्याने, उर्वशी कराराप्रमाणे त्याला सोडून निघाली, तेव्हा तिच्या वियोगाने राजा अतिशय शोकाकुल झाला. आपल्याला सोडून निघून जाणाऱया उर्वशीच्या मागे राजा पुरूरवा नग्न अवस्थेत वेडय़ासारखा अतिशय विव्हळ होऊन, जात जात म्हणू लागला “हे नि÷gरहृदये प्रिये थांब, थांब’’. राजाच्या कामासक्तीची कमाल पहा! बघितलं तर पुरुरवा चक्रवर्ती राजा होता, पृथ्वीचे परिपालन करण्यात वरि÷, स्वधर्मकर्मात श्रे÷, धार्मिक, शत्रुचा संहार करण्यात मोठा शूर व पराक्रमाने मोठा वीर होता. तसेच वेदशास्त्रविवेक जाणणारा होता. त्याला सारे लोक वंदन करत असत. असे जरी असले तरी सुद्धा एका वेश्येचा केवळ दास बनून राहिला! देवदानवा समोरही जो कधी खाली मान करत नसे, ज्याला रेसभरही अपमान सहन होत नसे, तो आपला थोरपणा विसरून एका वेश्येपुढे दीन झाला.
उर्वशी निघाली आहे असे पाहताच तो तसाच उघडय़ा अंगाने रडत धडपडत तिच्या पाठीस लागला. त्याची अवस्था इतकी केविलवाणी झाली होती की, हुंदके देताना त्याच्या तोंडातून नीट शब्द फुटेना. “अग! एकदा मला डोळे भरून तुला पाहू दे, हितगुजाच्या गोष्टी तरी एकदा बोलून घेऊ दे, एक क्षणभर तू दृष्टीआड झालीस तर हा जीव अगदी जाईल असं वाटतं! माझ्या पूर्वजांची शपथ घेऊन सांगतो की, तुझे वचन मी कधीही उल्लंघन करणार नाही. हे माझे प्रमाण अगदी सत्य मान. तुला रुसायला कारण तरी काय? चालताना तुझ्या पायाला खडे बोचतील. तू जात आहेस तरी कुठं? मीही तुझ्याबरोबर येतो. अग जाऊ नकोस, थोडी उभी रहा, एकदा मागे वळून माझ्याकडे पहा तरी.’’ असे म्हणून तो तिचे पाय धरावयास लागला.
तरीही त्याच्याकडे न पाहताच ती निघून गेली. ज्याला मोठमोठाले राजे नेहमी लोटांगण घालावयाचे, तो राजाधिराज वेश्येच्या पायाला लागला! ह्यावरून ह्या कामाची करणी किती विलक्षण आहे पहा! तो म्हणाला, तुझा मला अतिशय कळवळा येतो, तुझ्यासाठी माझे चित्त अगदी तळमळते, तू केवळ पाषाणहृदयी बनलीस ना? इतका राग का बरे धरलास? अशा प्रकारे राजाचे चित्त अत्यंत विरहातुर आणि शोकाने व्याप्त झाले. तो अतिशय ग्लानियुक्त झाला.
उर्वशीने त्याचे चित्त आकर्षून घेतले होते. तिच्यासह क्षुद्र विषयांच्या सेवनामध्ये तो इतका बुडून गेला होता की, कित्येक वर्षाच्या रात्री आल्या आणि गेल्या तरी त्याला त्याचे ज्ञान नव्हते.
क्रमशः








