बेळगाव : काँग्रेस रोड ते एमएलआयआरसीच्या रायगड गेट दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत व झाडेझुडुपे हटविण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर तेथील केरकचराही उचलला जात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. काँग्रेस रोड ते नानावाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गवत व झाडेझुडुपे वाढली होती. हा रस्ता अत्यंत रहदारीचा असून एमएलआयआरसी, अंगडी महाविद्यालय, सावगाव, मंडोळी, हंगरगे आदी गावांतील रहिवासी व विद्यार्थी या मार्गावरून सातत्याने ये-जा करत असतात. मात्र रस्त्याच्याकडेला वाढलेल्या गवत व झाडीझुडपामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. रस्त्यावर पथदीप नसल्याने रात्रीच्यावेळी रस्त्याचा अंदाज येणे कठीण झाले होते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गटारी बांधण्यात आल्या आहेत. मात्र गवतामुळे गटारींचा अंदाज येणेही अवघड झाले होते. अलीकडेच सदर गटारीमध्ये एक मोकाट गायदेखील पडली होती. सदर गायीला सामाजिक कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या जवानांनी गटारीतून बाहेर काढले होते. त्यामुळे रस्त्याची सफाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून गवत व झाडेझुडुपे हटविण्याचे काम हाती घेतले आहे. गणेशोत्सवाच्या तेंडावर स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
Previous Articleमनपा स्थायी समितीच्या अध्यक्षांना मिळाले कक्ष
Next Article मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना ओळखपत्र द्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









