महापालिका नोकर संघटनेच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
मनपात अधिकारी आणि कर्मचाऱयांमध्ये निर्माण झालेल्या दुहीमुळे नोकर संघटनेच्या एकीला बाधा पोहोचत आहे. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी असताना कर्मचाऱयांतील मतभेद योग्य नाही. निर्माण झालेल्या दुफळीमुळे मनपा नोकर संघटनेचे कामकाज आगामी 3 महिन्यांसाठी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपा कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये गटबाजीमुळे वाद होत आहेत. सभागृह अस्तित्वात नसताना मनपात गटबाजी सुरू असल्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केल्यानंतर मनपा कार्यालयात खळबळ माजली. मनपात दोन संघटना वेगवेगळय़ा पद्धतीने कामकाज करीत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपा नोकर संघटनेच्या पदाधिकाऱयांची बैठक शुक्रवारी दुपारी आयोजित केली होती. या बैठकीत अधिकारी आणि कर्मचाऱयांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच
मुख्य संघटना कार्यरत असताना कोणतीच पूर्वसूचना न देता अन्य संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे मुख्य संघटनेच्या ध्येयधोरणांना बाधा पोहोचत आहे. मनपा कार्यालयात काम करणाऱया कामगारांच्या हितासाठी मुख्य संघटना नेहमी कार्यरत असते. मनपात विविध गट-तट असले तरी कर्मचाऱयांच्या हितासाठी एकत्रित येऊन लढा दिला जातो. पण काही अधिकारी व कर्मचारी मुख्य संघटनेला विश्वासात न घेता कार्यरत आहेत. मनपाच्या इतिहासात अशा प्रकारे कधीच घडले नाही. त्यामुळे मुख्य संघटनेचे कामकाज 3 महिन्यांकरिता स्थगित ठेवण्याचा निर्णय महापालिका नोकर संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
महापालिका कार्यालयात काही अधिकाऱयांमध्ये वाद निर्माण झाल्याने याचे पडसाद कर्मचाऱयांमध्ये उमटत आहेत. कर्मचाऱयांमध्ये दुफळी निर्माण झाल्याने याचे परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत आहेत. नागरिकांसह कर्मचाऱयांना याचा फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिका मुख्य संघटनेने कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटना अध्यक्ष मल्लिकार्जुन गुंडप्पण्णावर यांनी दिली.
बैठकीला संघटनेचे सचिव भरत तळवार, सल्लागार अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, शेळ्ळीकेरी, आनंद पिंपरे, रवी पुरेकर, साताक्का तळवार, राजश्री जाधव, सुरेश द्यावण्णावर, महांतेश नाईक, विशाल उच्चूकर, संतोष ओ. सी., परशराम कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.









