काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या टीकेनंतर भाजपचे चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गोरखपूरच्या प्रसिद्ध गीता प्रेसला 2021 चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. जयराम रमेश यांच्या ट्विटनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही त्यांना रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. तसेच भारताची वैभवशाली प्राचीन सनातन संस्कृती आणि जुने ग्रंथ आज वाचनासाठी सहज उपलब्ध होण्यामागे गीता प्रेसचे योगदान अतुलनीय असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. तसेच जयराम रमेश यांच्या वक्तव्यावरून गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनीही काँग्रेसला घेरले आहे.
गीता प्रेस गोरखपूरला गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याच्या घोषणेवरून राजकारण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2021 च्या गांधी शांतता पुरस्कारासाठी गीता प्रेस गोरखपूरची निवड जाहीर केली. यानंतर सांस्कृतिक मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर गीता प्रेस मंडळानेही पुरस्कार स्वीकारण्याची घोषणा केली आहे. मात्र, राजकीय नेत्यांकडून पुरस्कारावरून वेगवेगळी वक्तव्ये होत असल्याने शाब्दिक वादंग वाढताना दिसत आहे.
गोरखपूरस्थित गीता प्रेस 100 वर्षांहून अधिक काळ रामचरित मानसपासून श्रीमद् भगवद्गीतेपर्यंत अनेक पवित्र ग्रंथ नि:स्वार्थपणे लोकांपर्यंत नेण्याचे अद्भुत कार्य करत आहे. गीता प्रेससाठी 2021 चा गांधी शांतता पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा केलेला आदर आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदलासाठी गीता प्रेसने दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट पेले आहे.
जयराम रमेश यांच्या ट्विटशी काँग्रेस असहमत?
गीता प्रेसला देण्यात आलेल्या पुरस्कारावर काँग्रेसने टीका केली आहे. जयराम रमेश यांनी गीता प्रेस गोरखपूरला गांधी शांती सन्मानाने सन्मानित केल्याच्या घोषणेवर जोरदार हल्ला चढवला. 2021 चा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस, गोरखपूरला देण्यात आला आहे. हा निर्णय खरे तर फसवणूक करणारा आहे. ही कृती सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कार देण्यासारखे आहे, असे जयराम रमेश म्हणाले. तथापि, जयराम रमेश यांच्या या ट्विटशी काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते सहमत नसल्याचे दिसते.
आसामच्या मुख्यमंत्र्यांकडूनही प्रत्युत्तर
भाजप नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही याप्रकरणी ट्विट केले आहे. कर्नाटकमधील विजयामुळे काँग्रेसने सभ्यतावादी मूल्ये आणि वारशाच्या विरोधात उघडपणे युद्ध सुरू केले आहे, मग तो धर्मांतरविरोधी कायदा रद्द करणे असो किंवा गीता प्रेसवरील टीका असो. देशातील लोक काँग्रेसच्या या आक्रमकतेला विरोध करतील, असे सरमा यांनी म्हटले आहे.
रवी किशन यांचा हल्लाबोल
गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी जयराम रमेश यांच्या ट्विटवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या लोकांची मानसिकता केवळ पाकिस्तानधार्जिणी आणि व्होटबँकेवर आधारित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशी मानसिकता असलेले लोक केवळ तुष्टीकरणासाठी राजकारण करतात, असे ते म्हणाले.
हिंदू धर्माच्या प्रचारात गीता प्रेसचा मोठा वाटा आहे. गीता प्रेस 1923 मध्ये सुरू झाली आणि जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. गीता प्रेसने 14 भाषांमध्ये 41.7 कोटी पुस्तके प्रकाशित केली आहेत. यामध्ये श्रीमद् भगवद्गीतेच्या 16.21 कोटी प्रतींचा समावेश आहे.









