वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिम्पियन तलवारबाज भवानी देवी हिने सोमवारी चीनच्या वूशी येथील आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिला सेबर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत इतिहास रचला. भवानीने उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान विश्वविजेत्या जपानच्या मिसाकी इमुरा हिला 15-10 असे पराभूत केले. उपांत्य फेरीत मात्र तिला उझबेकिस्तानच्या झेनाब देबेकोव्हाकडून 15-14 असा निसटता पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. दरम्यान, या शानदार कामगिरीनंतर फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी भवानीचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. भारतीय तलवारबाजीसाठी हा खूप अभिमानाचा दिवस आहे. याआधी कोणीही जे करू शकले नाही ते भवानीने करून दाखवले आहे. प्रतिष्ठित आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय तलवारबाज आहे. असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, 29 वर्षीय भवानीला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कझाकस्तानच्या डोसपे करिनाला पराभूत करण्यापूर्वी राऊंड ऑफ 64 च्या फेरीत बाय मिळाला होता. त्यानंतर भवानीने प्री-क्वार्टर फायनलमध्ये तिसऱ्या मानांकित ओझाकी सेरीचा 15-11 असा पराभव केला.









