संसदेतील गदारोळासंबंधी अमित शहा यांची टीका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा दिली, म्हणून काँगेसने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत एक दिवसही कामकाज होऊ दिले नाही, हे जनतेने पाहिले आहे. आता आगामी निवडणुकांमध्ये हीच जनता काँगेसला धडा शिकविल्याखेरीज राहणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
त्यांनी शुक्रवारी कोशांबी येथे कोशांबी महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यानंतर ते जाहीर सभेत भाषण करीत होते. काँगेस पक्ष कमालीचा व्यक्तीकेंद्री आहे. राहुल गांधींना शिक्षा झाली याचा राग या पक्षाने संसदेवर काढला. कामकाज सातत्याने बंद पाडून लोकांचा पैसा वाया घालविला. देशाची हानी केली. संसदेचा वेळ एका व्यक्तीसाठी वाया घालविणे उचित नाही. लोक हे लक्षात घेतील आणि काँगेसला योग्य तो धडा शिकवतील, अशी टीका त्यांनी भाषणात केली.
लोकशाही नव्हे, घराणेशाही धोक्यात
लोकशाही धोक्यात आली आहे, अशी हाकाटी विरोधी पक्ष पिटीत आहेत. तथापि, देशात लोकशाही अत्यंत सुरक्षित आहे. ती कोणत्याही प्रकारे धोक्यात आलेली नाही. तथापि, घराणेशाही धोक्यात आली आहे. जे पक्ष एका घराण्यावरच अवलंबून आहेत, ते आता धास्तावले आहेत. म्हणून त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी लोकशाहीची गळचेपी होत असल्याचा आव आणला आहे. मात्र, ही बनवेगिरी चालणार नाही, अशी जोरदार टीका शहा यांनी केली.
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, तसेच आणखी एक उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, राज्य भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी आदी मान्यवर नेते उपस्थित होते. हा उत्सव उत्तर प्रदेशात अत्यंत महत्वाचा मानला जातो. लक्षावधी लोक या उत्सवाला उपस्थित असतात.









