राज्यांना सूचना : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोनास्थितीचा आढावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी मांडविया यांनी सर्वांना सतर्क राहण्यास सांगितले. सद्यस्थितीत घाबरण्याची गरज नसली तरी मॉक ड्रीलच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. रुग्णालयांमधील सुसज्जतेचा आढावा घेण्यासाठी 10-11 रोजी मॉक ड्रील घेण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना करण्यात आली आहे. तत्पूर्वी रविवारी, 9 रोजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे कोरोना चाचणी आणि जीनोम सिक्वेन्सिंग वाढवावी लागेल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात सहा हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गुरुवारी कोरोनाचे पाच हजारांहून अधिक रुग्ण आले होते. हे प्रमाण गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. काही राज्यांमध्ये कोरोनाची अधिक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच देशपातळीवर एसओपी जारी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्ये-केंद्रशासित प्रदेशांची आढावा बैठक घेतली.
21 राज्यांतील 72 जिह्यात रेड अलर्ट
गेल्या चार आठवड्यांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे 21 राज्यांतील 72 जिल्हे रेड अलर्टमध्ये आले आहेत. या जिह्यांमध्ये गेल्या आठवडाभरात 12 ते 100 टक्के सॅम्पल कोरोनाबाधित आढळली आहेत. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये कोविड दक्षतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना करण्यात आली. तसेच अधिक संसर्ग पसरलेल्या जिह्यांबाबत चर्चा झाली. त्यानुसार, कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग 10 टक्क्मयांपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. याशिवाय गर्दी नियंत्रणाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वेही या भागात लागू करण्याची तोंडी सूचना करण्यात आली आहे.
काही राज्यांची स्थिती चिंताजनक
दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधील बरेच जिल्हे रेड अलर्टवर आहेत. दिल्लीतील 11 पैकी नऊ जिह्यांमध्ये सर्वाधिक संसर्ग झाले आहेत. दिल्लीनजीकच्या गुरुग्राम-फरिदाबाद आणि उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर या जिह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अनुक्रमे 12.84, 12.06 आणि 11.72 टक्के आहे. गेल्या 24 तासांत देशात 6,050 नवीन रुग्ण आढळले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडाही 28 हजार 303 वर पोहोचला आहे.









