चंदीगढ / वृत्तसंस्था
खलिस्तानवाद्यांचा म्होरक्या बनण्याचा प्रयत्न करीत असलेला दहशतवादी अमृतपालसिंग हा शरण येण्याची शक्यता आहे. त्याने शरण यावे, असे आवाहन अकाल तख्ताने केल्याने तो लवकरच पोलिसांच्या आधीन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता पंजाबमधील सर्व पोलिसांच्या रजा आणि सुट्टय़ा 14 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.
अमृतपालसिंग हा दुसरा भिंद्रनवाले बनण्याच्या तयारीत आहे, असे बोलले जात आहे. त्याने शीखांच्या समस्यांवर विचार करण्यासाठी सरबत खालसा संम्मेलन बोलाविण्याची मागणी अकाल तख्ताकडे केली होती. तेव्हापासून पंजाब पोलीस दक्ष झाले असून ते त्याला पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, आतापर्यंत त्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यश मिळविले आहे. तो अमृतसरमधील शीखांचे पवित्र मंदिर असणाऱया सुवर्णमंदिरात तळ ठोकून आहे, असे बोलले जाते.
त्याने शीखांचे संमेलन बोलाविण्याची मागणी केल्यानंतर अकाल तख्ताचे अधिकारीही सक्रीय झाले आहेत. अकाल तख्ताचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी बैशाखी साजरी करण्यासाठी तख्त दमदमा टंकसाल येथे तीन दिवसांचा वार्षिक कार्यक्रम घोषित केला होता. सरबत खालसा संमेलन शीखांच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते. स्वतंत्र भारतात आजपर्यंत ते केवळ दोनदा म्हणजे 1986 आणि 2015 मध्ये बोलाविण्यात आले होते. अमृतपाल हा ‘वारीस पंजाब दे’ या संस्थेचा संस्थापक असून तो 18 मार्चपासून बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरु आहे.









