मंत्री बाबूश मोन्सेरात यांचा सरकारला इशारा
पणजी : स्मार्ट सिटी अंतर्गत राजधानीत विविध परिसरात चालू असलेल्या अनेक प्रकल्पांचा दर्जा आणि दिरंबाईबाबत महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. याप्रश्नी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना खडसावताना त्यांनी सर्व सदोष आणि गहाळ घटक बदलण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी पणजीतील विविध भागात मनपा अधिकाऱ्यांसमवेत स्मार्ट सिटी कामांची पाहणी केल्यानंतर मोन्सेरात बोलत होते. बालभवन परिसरात बनविण्यात आलेल्या पदपथाचा दर्जा निकृष्ट असून यापूर्वीचा दर्जा कित्येक पटींनी चांगला होता. याच भागात बसविण्यात आलेल्या पेव्हर्स ब्लॉक्सच्या दर्जाहीन कामांबद्दल आपण साबांखामंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे तक्रार केली आहे, असे मोन्सेरात यांनी सांगितले. ही सर्व कामे आणि त्यांचा दर्जा पाहता त्यांची गुणवत्ता आणि देखभाल यासाठी मनपाला जबाबदार धरता येणार नाही, असा दावा मोन्सेरात यांनी केला आहे. bस्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पीडब्ल्यूडी नियुक्त कंत्राटदाराच्या माध्यमातून मिरामार येथील प्रोमोनेडच्या सुशोभिकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. ते तयार झाल्यानंतर उद्घाटन करून देखभालीसाठी सीसीपीकडे सुपूर्द करण्यात येईल, असे मोन्सेरात यांनी सांगितले. दरम्यान, दोनापावला सर्कलपासून मिरामार सायन्स सेंटरपर्यंतच्या मार्गावर विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. त्यांच्या जागा लवकरच निश्चित करण्यात येतील, अशी माहिती मोन्सेरात यांनी दिली.









