वृत्तसंस्था / इंफाळ
59 व्या फेमिना मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेची विजेती जाहीर करण्यात आली असून राजस्थानची नंदिनी गुप्ता हिने ‘मिस इंडिया 2023’चा बहुमान पटकावला आहे. मागील वषीची मिस इंडिया सिनी शेट्टी हिने नंदिनीला विजेतेपदाचा ‘ताज’ घातला. मिस इंडिया ही स्पर्धा जिंकल्यानंतर नंदिनी आता मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
19 वर्षीय नंदिनी गुप्ता मिस इंडिया स्पर्धेची विजेती ठरली. या स्पर्धेत श्रेया पुंजा आणि स्ट्रॅल थौनाओजम लुवांग या फस्ट आणि सेकंड रनर-अप ठरल्या. मिस इंडिया स्पर्धेत नंदिनी गुप्ताने काळ्या रंगाच्या पेहरावात रॅम्प वॉक केला. मणिपूरमध्ये फेमिना मिस इंडिया’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, कार्तिक आर्यन, नेहा धुपिया आणि मनीष पॉल आदी बरेच कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नंदिनी गुप्ता ही राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी आहे. कोटा येथेच तिचे शैक्षणिक धडे घेत बिझनेस मॅनेजमेंटपर्यंतचा पल्ला गाठला आहे. लहानपणापासूनच ती ‘फेमिना मिस इंडिया’ची विजेती बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून होती. यापूर्वी ती ‘फेमिना मिस इंडिया राजस्थान’ची विजेती ठरली होती. आता वयाच्या अवघ्या 19 व्या वषी ‘मिस इंडिया’ होऊन नंदिताने अनेक मुलींना प्रेरणा दिली आहे. नंदिनी ही आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असून तिचे लाखो चाहते आहेत.









