आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे गौरवोद्गार
प्रतिनिधी /येळ्ळूर
मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा विकास होवू शकतो. यासाठी अधिकाधिक मातृभाषेतूनच शिक्षण घेण्याकडे आणि संस्थांनी विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. येळ्ळूर येथील चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या शाळांनी हे काम चोखपणे पार पाडले असल्याचे सांगत या संस्थेचे कौतुक ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले आहे.
चांगळेश्वरी शिक्षण मंडळ व चांगळेश्वरी हायस्कूल यांचा संयुक्त महोत्सव कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष वाय. एन. मजुकर होते. यावेळी या संस्थेला सर्वतोपरी साहाय्य आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खानापूरसारख्या दुर्गम भागामध्ये या संस्थेने शाळा सुरू केल्या आहेत. याबद्दलही त्यांनी संस्थेचा गौरव केला. शैक्षणिक कार्यामध्ये कोणीही राजकारण आणू नये असेही त्यांनी सांगितले.
राजहंसगड किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारणार
राजहंसगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हटले. संचालिका कांचन वाय. मजूकर यांच्या हस्ते चांगळेश्वरी देवीची पूजन केले.
कार्यक्रमाला खानापूर अर्बन बँकचे चेअरमन अमृत शेलार, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, मालोजी अष्टेकर, येळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, युवराज कदम, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळीसह इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी वाय. एन. मजुकर यांच्या कार्याचा गौरव सर्वांनी केला. सचिव प्रसाद मजुकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी, माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.









