प्रतिकिलो 60 ते 65, वाढत्या दरामुळे ग्राहक हैराण
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठ दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होवू लागली आहे. एरव्ही 25 ते 30 रुपयाला प्रतिकिलो मिळणारा कांदा 60 ते 65 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे कांद्याने सर्वसामान्यांचे वांदे केले आहेत.
कांद्याच्या दरात 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शुक्रवारी किरकोळ बाजारातील कांद्याची विक्री बफर स्टॉकमधून 25 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप हा कांदा किरकोळ बाजारात दाखल झाला नाही. त्यामुळे शनिवारी बाजारात ग्राहकांना 60 ते 65 रुपये प्रतिकिलो दरानेच कांदा खरेदी करावा लागला.
गेल्या 15 दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी वाढ झालेली पहावयास मिळत आहे. आवक मंदावल्याने कांद्याच्या दरात वाढ होवू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा खरेदी करणे आता अशक्य होत आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या भाव नियंत्रणासाठी केंद्र सरकार पुढे सरसावले आहे. बफर स्टॉकमधून 25 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या बफर स्टॉककडे सर्वसामान्य जनतेच्या नजरा लागल्या आहेत.
खरीप हंगामातील कांदा अद्याप बाजारात आला नाही. त्यामुळे कांद्याचे वाढीव दर डिसेंबरपर्यंत टिकून राहतील, अशी माहितीही व्यापाऱ्यांकडून उपलब्ध झाली आहे. मात्र नवीन कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर कांद्याचे दर घसरण्याची शक्यता आहे. पावसाअभावी यंदा नवीन कांदा लागवडीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे कांद्याची आवक घटली आहे. परिणामी बाजारात कांदा दरात मोठी वाढ झाली आहे.
दैनंदिन आहारात कांदा महत्त्वाचा आहे. मात्र आता दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांची वाढली आहे. गृहिणी, हॉटेल व्यवसायिक आणि इतर लहान व्यावसायिकांनाही याचा फटका सहन करावा लागणार आहे. आधीच तुरडाळ, खाद्य तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यातच वाढत्या कांदा दराची भर पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे आता असह्य होणार आहे.









