हिमालयाच्या कुशीत विजयाचा आनंद सेलिब्रेशन केल्यानंतर आज लखनऊत लढत आहे ती क्रिकेटच्या जन्मदात्यांशी. विजयाची भिंगरी लावत पाच ठिकाणी भारतीय संघाने विजयाच्या पाऊल खुणा सोडल्यात. अर्थात आजचे ठिकाण आहे ते मुक्काम पोस्ट लखनऊ. भारतीय संघाने पाच पेपर चुटकी सारखे सोडवले. एखाद्या हुशार विद्यार्थ्यांनी तीन तासाचा पेपर दोन तासात सोडवावा अगदी त्याचप्रमाणे भारतीय संघाने हे पेपर सोडवले. आजचा सहावा पेपर इंग्लिश. म्हणजे त्या अर्थाने नव्हे तर दुसऱ्या अर्थाने सामना आज इंग्लंडविरुद्ध (साहेबांविरुद्ध).
इंग्लंडचा विचार केला तर ते गत विश्वविजेते. गतविश्व विजेतेपदाचा आपला लौकिक एवढा रसातळास पोचवतील असे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बघा ना या संघाकडे ज्या ज्या क्रिकेट विश्लेषकाने नजर टाकली होती, त्या सर्वांनी इंग्लंडला सुपरफोरमध्ये गृहीत धरलं होतं. किंबहुना काही विश्लेषक तर इंग्लंड संघ भारतात होणाऱ्या क्रिकेटच्या सर्वात मोठ्या रियालिटी शोमध्ये बिग बॉस बनू शकतो असे भाकीत केले होते. क्रिकेट हा खेळ हा तसा चमत्कारिक. तुम्ही एखाद्या संघाला गृहीत धरला तर फसलातच. नव्हे हा खेळ तुम्हाला स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता कधी दाखवेल हे कळणार नाही. तसं पाहिलं तर भारत हा देश इंग्लंडसाठी आवडत ठिकाण. 1987 च्या विश्वचषक स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीत भारताविरुद्ध इंग्लंडच्या ग्रॅम गुचने मनिंदर सिंग आणि रवी शास्त्राrला 75ज्ञ् स्वीपचे फटके मारत भारताला हैराण करत सोडत त्या सामन्यात भारताला पराभवाची चव चाखायला लावली होती. अर्थात तो सामना मी अजूनही विसरलो नाही. अर्थात त्याला कारणही तसेच होतं की 1983 नंतर सलग दुसऱ्यांदा अंतिम करीत धडक मारण्याची नामी संधी भारताला आली होती.
विश्वचषकाच्या अगोदर पहिला सामना खेळण्या अगोदर, साहेबांकडे जर नजर टाकली तर झटपट क्रिकेटच्या चौकटीत अगदी फिट बसणारे फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलूंची मांदियाळी असलेला संघ. ज्याप्रमाणे भोपाळ वायू गॅस दुर्घटनेचा फक्त विषय काढला तरी ज्याप्रमाणे अंगावर काटे येतात त्याचप्रमाणे भविष्यात इंग्लंडला 2023 च्या विश्वचषकाचे नाव काढलं तरी काटा आला तर नवल वाटू नये. पण या विश्वचषकात इंग्लंडचे संघ पूर्णत? होरपळला गेला. काही हिंदी चित्रपट पूर्ण होण्यास बरेच वर्षे लागतात. तीच गोष्ट इंग्लंडची क्रिकेटच्या बाबतीत. विश्व विजेतेपदाचा मान त्यांना तब्बल 44 वर्षानंतर मिळाला. तसं पाहता तो या अगोदर म्हणजे बाराव्या वर्षी आला असता पण माईक गॅटिंगला त्यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा मोह अनावर झाला होता.
याच इंग्लंडशी आज भारताची लढत आहे. ज्या पद्धतीने भारतीय संघ अमानुष पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाची कत्तल करत एक एक गड काबीज करत आहे त्यावरून साहेबांविरुद्धचा सामना जास्त जड गेला तरच ती बातमी होऊ शकते. इंग्लंडकडे तूर्तास तरी गमावण्यासारखे काही नाही. त्यामुळे साहजिकच इंग्लंडचा संघ काही वेगळं करण्याचा प्रयत्न करणार. पहिल्या पाच सामन्यात भारतीय फलंदाजांनी समोरच्या गोलंदाजांना वेठबिगार करून टाकले आहे. दुसऱ्या बाजूने प्रत्येक वेळी भारतीय गोलंदाजांनी समोरच्या फलंदाजांची अनधिकृत घरे बुलडोजर चडवत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून टाकलीत. केवढी ही दहशत पहिल्या पाच सामन्यात! हाच दरारा आता भारतीय संघाने इंग्लंडला दाखवत त्यांच्यावर शेवटचा वरवंटा फिरवलाच पाहिजे. एकंदरीत या सामन्यानंतर साहेबांच्या हातात नारळ दिला जाणार एवढं मात्र निश्चित!









