म. ए. समिती महिला आघाडीचे भगिनींना आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून प्रतिवर्षी 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागात काळादिन पाळून मूक सायकल फेरी काढली जाते. यावर्षीही मराठी भाषिक आपले व्यवहार बंद करून काळ्यादिनी निघणाऱ्या निषेध फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विशास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडी अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी व्यक्त केला.
महिला आघाडीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये 1 नोव्हेंबरबाबत महिलांमध्ये जागृती करण्यात आली. मागील 66 वर्षांपासून मराठी माणसाने निष्ठेने सीमाप्रश्न जिवंत ठेवला आहे. लढ्याला पाठबळ देण्यासाठी महिलांचासुद्धा मोठा सहभाग आहे. आपली भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक महिला या लढ्यामध्ये सहभागी आहे. 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सायकलफेरीमध्ये सीमाभागातील महिलांनी सकाळी 9 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
माजी महापौर सरिता पाटील म्हणाल्या, महिलांनी काळ्या साड्या घालून आपला निषेध दाखवून द्यायचा आहे. या बैठकीला प्रिया कुडची, राजश्री बडमंजी, माला जाधव, अर्चना कावळे, मंजुश्री कोलेकर, शामिना पाटील, श्रद्धा मंडोळकर, आशा सुपली, अर्चना देसाई यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या









