खेड :
कार संरक्षक भिंतीवर आदळून झालेल्या भीषण अपघातात अनिल देवीदास कांबळे (55, चरवली-हवेली, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले. मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हद्दीतील भोगाव पुलाजवळ गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे काहीकाळ महामार्ग ठप्प झाला होता.
लिंगाप्पा कटेप्पा पातारे (29, दिघी-पुणे), नागेश मलके कांबळे (37), विकास शंकर चव्हाण (18, दोघे रा. चरवली-हवेली, पुणे) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच कशेडीतील वाहतूक पोलीस मदत केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने अपघातस्थळी पोहोचून जखमींसाठी मदतकार्य केले.
चालक लिंगाप्पा पातारे हा कार घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. भोगाव पुलाजवळ आल्यावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट डाव्या बाजूच्या संरक्षक भिंतीवर आदळून उलटली. अपघातात कारचाही चुराडा झाला. अपघातानंतर खोळंबलेली वाहतूक काही वेळानंतर पूर्ववत केली.








