डुक्कर मालकांना पुन्हा तंबी देण्याची मागणी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड परिसरामध्ये दोन वर्षापूर्वी काकती पोलीस स्टेशनच्यावतीने डुक्कर मालकांना तंबी देऊनही डुक्कर पालन व्यवसाय पुन्हा फोफावल्यामुळे भात पिकांचे व गवताचे नुकसान करणे सुरू असल्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रा. पं. ने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन काकती पोलीस स्टेशनला कळवून डुक्कर मालकांना परत तंबी देऊन सदर व्यवसायाला लगाम लावून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. डुक्कर मालकांना ग्रा. पं. च्यावतीने अनेकवेळा कळवून सुद्धा तसेच ग्रा. पं. कार्यालयामध्ये बोलावून सांगून सुद्धा काहीफरक पडला नाही. शेवटी ग्रा. पं. व ग्रामस्थांनी आक्रमक होऊन काकती पोलीस स्टेशनला कळविण्यात आले.
लगेच काकती पोलीस स्टेशनच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकांनी ग्रा. पं. कार्यालयांना भेट देऊन डुक्कर मालकांना बोलावून घेऊन कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड परिसरातील डुकरे पकडून घेऊन जाणे तसेच परत सोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या अटींवर डुक्कर पालन मालकांना बजावल्यामुळे त्यांनी आपली डुकरे पकडून नेल्यामुळे कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड परिसरातील शेतकरी वर्गाने सुद्धा समाधान व्यक्त केले होते. परंतु सहा महिन्यांपासून सदर डुक्कर मालकांनी परत या परिसरामध्ये डुकरे सोडल्यामुळे सर्वत्र कळपच्या कळप दिसत आहेत. यामुळे काकती पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन डुक्कर पकड मोहीम राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.









