डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळाची मागणी
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी हरिजन वाड्यात 15 व्या वित्त आयोगामार्फत सन 2021-2022 तसेच 2023-2024 सालात मंजूर केलेल्या निधी अंतर्गत अनेक कामे अर्धवट असून बरीच कामे केवळ कागदोपत्रीच नोंद असल्याचा आरोप करून विकासकामातील गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळाच्यावतीने मोर्चाद्वारे जांबोटी ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जांबोटी येथील हरिजन वाड्यामध्ये पंधराव्या वित्त आयोगांतर्गत राखीव विकास निधीमधून सी. सी. गटार बांधकाम, सी. सी. रोड, समुदाय भवन स्वच्छता, गटारी स्वच्छता, पिण्याचा पाणीपुरवठा, कूपनलिका खुदाई, सांडपाणी निचरा आदी कामासाठी लाखोंचा निधी मंजूर केला होता. मात्र यापैकी बरीच कामे अर्धवट असल्यामुळे या कामांमध्ये गैरव्यवहार झाला आहे.
सदर विषयावर बुधवार दि. 10 रोजी झालेल्या जांबोटी ग्राम पंचायतीच्या मासिक बैठकीत चर्चा केली. त्यानुसार गेल्या दोनवर्षांत पंधराव्या वित्त अयोगामार्फत जांबोटी हरिजन वाड्यात मंजूर झालेल्या विकासकामांपैकी बऱ्याच कामांचा निधी अद्याप खर्च करण्यात आला नाही. तसेच अर्धवट कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब युवक मंडळ व नागरिकांना ग्राम पंचायतीच्यावतीने देण्यात आले आहे. मात्र ग्राम पंचायतीने या आश्वासनावर आंबेडकर युवक मंडळाचे समाधान झाले नसल्यामुळे ग्राम पंचायतीने येत्या सोमवारपर्यंत योग्य स्पष्टीकरण देऊन आश्वासनांची पूर्तता करावी, तसेच अर्धवट कामासंदर्भात त्वरित कार्यवाही करून गैरव्यवहाराची चौकशी करावी, अन्यथा बेळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा समाज कल्याण खात्याच्या कार्यालयावर नागरिकांच्या मोर्चा काढून निवेदन देण्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळाच्यावतीने देण्यात आला आहे.









