कृषीमंत्र्यांचा इशारा : मागणी-पुरवठ्यात समन्वय साधण्याचा सल्ला
बेळगाव : यंदा मान्सूनला विलंब झाल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर लगेच पेरण्या सुरू होणार आहेत. त्यामुळे बियाणे, खतांची कमतरता भासू नये, याची अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना देतानाच कृषीमंत्री चेलुवरायस्वामी यांनी निकृष्ट बियाणांचे वितरण झाले तर अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा दिला आहे. खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषीमंत्र्यांनी आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक तयारी पूर्ण करण्याची सूचना केली आहे. बियाणे-खतांची मागणी व पुरवठा यावर लक्ष ठेवावे, शेतकरीही पावसाअभावी हवालदिल झाला आहे. म्हणून कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी शिस्तीने व समन्वयातून काम करावे, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना केली आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून बियाणे वितरित केली जातात. काहीवेळा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था करून घ्यावी. निकृष्ट बियाणांचे वितरण केले जात असल्यासंबंधी काही जिल्ह्यातून तक्रारी येत आहेत. यावर लक्ष ठेवावे. नहून अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही कृषीमंत्र्यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांनी खत व बियाणे विक्री केंद्रांची स्वत: पाहणी करून उपलब्धता, मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ ठेवावा. यावेळी कृषी खात्याचे सचिव अन्बुकुमार म्हणाले, हंगामाला उशीर झाल्यामुळे पावसानंतर सर्वत्र एकाचवेळी पेरण्या सुरू होणार आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन बियाणे व खतांची उपलब्धता किती आहे, याची संपूर्ण राज्यात खात्री करून घेण्यात आली आहे. मुडलगी येथे अलीकडेच गारांचा पाऊस झाला. त्याचे सर्वेक्षण करून परिहार पोर्टलमध्ये अपलोड केले आहे. लवकरच भरपाई देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.









