राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात शेतकऱ्यांनी नोंदविल्या तक्रारी
बेळगाव : रिंगरोडविरोधात कलखांब आणि यरमाळ गावच्या शेतकऱ्यांनी सोमवारी हरकती दाखल केल्या आहेत. आमची सर्व जमीन सुपीक असून कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, अशी हरकत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. रिंगरोडमध्ये तालुक्यातील 32 गावांच्या जमिनी जात आहेत. या सर्व जमिनी सुपिक आहेत. रिंगरोडला सर्वांनीच विरोध केला आहे. तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रिंगरोड करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रिंगरोडसाठी जमीन घेण्याबाबत शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. तालुक्यातील बहुसंख्य गावांतील शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आपल्या हरकती दाखल केल्या आहेत. सोमवारी कलखांब आणि यरमाळ गावच्या शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या. अॅड. शाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हरकती दिल्या आहेत. दरम्यान गॅस पाईपलाईनसह पेट्रोलपंपही या रिंगरोडमध्ये जात आहेत. त्यामुळे रिंगरोड रद्द करावा, अशी हरकतही यावेळी नोंदविण्यात आली. यावेळी मनोहर हुक्केरीकर, अर्जुन गोरल, दिनकर भरमोजी, भैरू बेळगावकर, वसंत मोतगेकर, शिवाजी मोतगेकर, भावकाण्णा प्रमोजी, यल्लाप्पा असोदेकर, गणपत पाटील, तानाजी हिरोजी, चंद्रकांत भाविमनी, मारुती बेळगावकर, बाबु बेळगावकर, उदय यल्लारी, मारुती हिरोजी, रमेश बेळगावकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









