क्षुल्लक कारणावरून घटना : पतीला अटक
बेळगाव : घर बदलण्यावरून झालेल्या भांडणानंतर पतीने कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीचा खून केल्याची घटना जुने बेळगाव येथे घडली आहे. यासंबंधी शहापूर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली असून प्रमोदिनी संपत सोमनाचे (वय 45) रा. गणेशपेठ गल्ली, जुने बेळगाव असे खून झालेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. तिचा पती संपत शंकर सोमनाचे (वय 47) याला सोमवारी अटक केली आहे. अटकेची कारवाई पूर्ण करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. खुनाच्या घटनेनंतर 24 तासांत फरारी आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी सोमवारी यासंबंधी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. रविवार दि. 11 जून रोजी सायंकाळी 4.45 वाजता आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालून संपत फरारी झाला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रमोदिनी यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांचा उपयोग न होता या महिलेचा मृत्यू झाला. प्रमोदिनी व संपत हे दाम्पत्य रहात असलेले घर जुने झाले आहे. पावसात भिंत कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे भाडोत्री घरात राहूया, असे विचार प्रमोदिनी यांनी मांडले. याच मुद्द्यावरून या दाम्पत्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर कुऱ्हाडीने घाव घालून पती फरारी झाला होता. शहापूर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.









