6 लाखाचा 4 किलो 180 ग्रॅम गांजा जप्त
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी टोलनाक्याजवळच्या हंचनाळजवळ बेकायदा गांजा विकणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून सुमारे 6 लाख रुपये किमतीचा 4 किलो 180 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. डीसीआरबी विभागाचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. के. कोळची, ए. एन. मसरगुप्पी, व्ही. व्ही. गायकवाड, एस. ए. बेवनूर, एन. आर. फड्याप्पन्नावर, एल. वाय. किलारगी आदींनी ही कारवाई केली आहे. साहेबराव विश्वनाथ पालिके (वय 50) रा. हलदेवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर, पुरुषोत्तम रामचंद्र कौलगी (वय 42) रा. पंढरपूर, जि. सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हत्तरगी टोलनाक्याजवळील हंचनाळनजीक गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून पोलिसांनी या जोडगोळीला अटक केली. त्यांच्याजवळून 4 किलो 180 ग्रॅम गांजासह गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकलही जप्त केली आहे. जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल केला आहे.









