शरीरात प्लास्टिकमुळे होणाऱया आजाराचा लागला शोध
पहिल्यांदाच प्लास्टिकमुळे होणाऱया आजाराचा शोध लागला आहे. वैज्ञानिकांनी या आजाराला प्लास्टिकोसिस हे नाव दिले आहे. सध्या हा आजार केवळ सागरी पक्ष्यांना होत आहे, परंतु भविष्यात हा आजार अनेक प्रजातींच्या जीवांमध्ये फैलावू शकतो अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
प्लास्टिकोसिस हा आजार समुद्रात शिकार करणाऱया पक्ष्यांना होत आहे. शिकारीसोबत या पक्ष्यांच्या शरीरात छोटय़ा आणि मोठय़ा आकाराचे प्लास्टिक पोहोचत आहे. यामुळे या पक्ष्यांच्या शरीराला नुकसान होऊ लागते. हळूहळू हे पक्षी आजारी पडून मृत्यूस सामोरे जात आहेत. वैज्ञानिकांनी प्लास्टिकोसिसमुळे शरीरावर होणाऱया प्रभावाचे अध्ययन केले आहे.

धारदार प्लास्टिकचे तुकडे अनेकदा पक्ष्यांच्या शरीरामध्ये गंभी ईजा पोहोचवत असतात. यामुळे पक्ष्यांचा तत्काळ मृत्यू होत असतो. अनेक सागरी पक्ष्यांच्या शरीरात प्लास्टिकोसिसचे दुष्परिणाम पाहिले आहेत. यामुळे सागरी पक्ष्यांच्या अनेक प्रजातींना नुकसान होत असल्याचे संशोधकांनी स्वतःच्या संशोधनलेखात म्हटले आहे.
समुद्रात प्लास्टिकचे प्रदूषण अत्यंत वेगाने वाढत आहे. प्लास्टिकमुळे सुमारे 1200 सागरी प्रजातींना नुकसान होत आहे. यामळे समुद्रातील अन्नसाखळी बिघडली आहे. अन्नासोबत शरीरात पोहोचलेले प्लास्टिक, सिंथेटिक फायबर्स आणि तुकडय़ांमुळे किती नुकसान होणार हे वैज्ञानिकांना अद्याप जाणून घेता आलेले नाही.
वैज्ञानिकांनी फ्लेश-फुटेड शीयरवॉटर्स या पक्ष्यावर अध्ययन केले आहे. हा पक्षी ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱयापासून 600 किलोमीटर अंतरावरील लॉर्ड होवे बेटावर अधिक प्रमाणात आढळून येतो. मानवी वस्तीपासून प्रचंड दूर राहत असलेल्या या पक्ष्यांना प्लास्टिकोसिस आजार होण्यामागे मानवच कारणीभूत आहे. या बेटावर दरवर्षी हजारो सागरी पक्षी आजारी पडून मरून जात होते. असे का घडतेय हे जाणून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत होते.
संशोधन केले असता पक्ष्यांच्या शरीरात प्लास्टिक शिरल्याचे आणि या प्लास्टिकमुळे त्यांच्या अवयवांना ईजा पोहोचत असल्याचे आढळून आले. पोटात गंभीर ईजा करणाऱया या प्लास्टिकपासून पक्ष्यांना वाचविता येऊ शकत नाही. पक्ष्यांचा पोटाचा पहिला हिस्सा म्हणजेच प्रोवेनट्रिकुलसमध्ये सर्वाधिक ईजा होत आहे.









