विजय आपलाच, साऱ्यांचेच भाकीत
बेळगाव : तहान, भूक हरपून गेल्या 15 दिवसांपासून सर्वच उमेदवार प्रचाराच्या कामात गुंतले होते. भरउन्हात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करत होते. सकाळी 7 पासून रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवार विविध गावांना भेटी देत होते. यामुळे साऱ्यांचीच दमछाक उडाली होती. प्रत्येक गावाला आणि प्रत्येक गल्लीबोळात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. बुधवारी मतदान झाले आणि साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दररोज सकाळी उठून घाईगडबडीत गाठीभेटी घेण्यासाठी सुरू असलेली धडपड थांबली आहे. आता शनिवार दि. 13 रोजी मतमोजणी असून त्याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अनेकांनी मतदानाची बेरीज करण्यास सुरुवात केली असून आपलाच उमेदवार विजयी होणार, असे भाकीतही सुरू केले आहे. मतमोजणी शनिवारी होणार आहे. त्यामुळे आता दोन दिवस विश्र्रांती घेऊन त्या दिवसाची सारेचजण उत्सुकतेने वाट पाहू लागले आहेत. काहीजणांनी आतापासूनच अंदाज बांधण्यास सुऊवात केली आहे. अतिउत्साही उमेदवारांचे समर्थक पेढे व फटाके वाजवून आपण विजयी होणार असल्याचे साऱ्यांनाच भासवू लागले आहेत. मात्र शनिवारीच जनतेने नेमका कुणाच्या बाजूने कौल दिला आहे? हे स्पष्ट होणार आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते आपणाला किती मते पडली आहेत, याबाबत चर्चा करत होते. गेल्या महिन्याभरापासून या निवडणुकीच्या धावपळीमुळे साऱ्यांचीच दमछाक झाली. त्यामुळे आता विश्रांती घेण्यासाठी काही उमेदवार जवळच्या आपल्या नातेवाईकांच्या घरी किंवा निर्जन्यस्थळी विश्र्रांती घेण्यामध्ये धन्यता मानली आहे. काहीजण विविध भागातील कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन मतदानाची आकडेवारी घेत आहेत. आपणाला किती मतदान झाले, याचा अंदाज आतापासूनच बांधू लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी अनेकांना विविध वस्तू दिल्या आहेत. तर अनेकांनी शेवटचे दोन दिवस पैशांची खैरात केली आहे. अनेक मतदारांनी सर्वच उमेदवारांकडून पैसे घेतले आहेत. मात्र त्यांनी नेमके मतदान कुणाला केले? हे समजणे अवघड झाले आहे. यामुळे अनेक उमेदवार संभ्रमात सापडले आहेत. काही उमेदवारांनी मतदानाच्या अगोदर साम, दाम, दंड यांचा वापर केला आहे. अशा उमेदवाराला सर्वसामान्य जनता मतदान करणार काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.









