सायंकाळी 6 पर्यंत 63.4 टक्के मतदान : म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांची मतदान करून घेण्यासाठी धडपड : मतदान केंद्रांच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बेळगाव : म. ए. समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण मतदारसंघामध्ये मोठ्या चुरशीने मतदान झाले. म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना सर्वत्र पाठिंबा वाढत होता. त्यामुळे वातावरण बरेचसे समितीमय झाले होते. बुधवारी मतदानाचा दिवस असल्यामुळे म. ए. समितीचे कार्यकर्ते सकाळपासूनच मतदान करून घेण्यासाठी धडपडताना दिसत होते. सकाळच्या टप्प्यामध्ये मतदान कमी झाले तरी सायंकाळच्या टप्प्यामध्ये बऱ्यापैकी मतदान झाले. दक्षिण मतदारसंघामध्ये सायंकाळी 6 पर्यंत 63.4 टक्के मतदान झाले आहे. य् ाsळ्ळूर गावामध्ये म. ए. समितीचे कार्यकर्ते मतदारांना मराठी अस्मितेसाठी मतदानाचे आवाहन करत होते.

गेल्या महिन्याभरापासून या गावातील सर्वच म. ए. समितीचे कार्यकर्ते राबले. याचबरोबर दक्षिण मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांनी कंबर कसली. येळ्ळूरमध्ये एकूण 10 हजार 628 मतदानापैकी 8 हजार 25 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. धामणे विभागामध्ये 6 हजार 280 मतदानापैकी 4 हजार 853 मतदारांनी मतदान केले आहे. बाळगमट्टी 520 पैकी 463 मतदान झाले आहे. याचबरोबर खादरवाडी गावामध्येही मोठ्या चुरशीने मतदान पार पडले आहे. मच्छे, पिरनवाडी या ठिकाणीही मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा दिसत होत्या. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरूच होते. युवा मतदारांबरोबरच वृद्धांनीही उत्स्फूर्तपणे मतदान केले. मजगाव, अनगोळ, चिदंबरनगर, भाग्यनगर, शहापूर, वडगाव, खासबाग, गोवावेस, भारतनगर, टिळकवाडी, हिंदवाडी, गोडसेवाडी, नानावाडी, पापामळा, भवानीनगर, गुरुप्रसाद कॉलनी, चन्नम्मानगर, उद्यमबाग या परिसरातही मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले.

दक्षिणमध्ये यावेळी म. ए. समितीचा एकच उमेदवार आहे. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली. म. ए. समितीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते. अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी धडपडत होते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये अधिक मतदान झाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. त्यामुळे आता म. ए. समितीच्या उमेदवारांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. किरकोळ घटना वगळता दक्षिण मतदारसंघामध्ये अत्यंत शांततेत मतदान पार पडले आहे. मच्छे येथे तर मतदान करण्यासाठी मतदारांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हा प्रशासनानेही मच्छे येथील शाळेच्या परिसरात भव्य मंडप उभा केला होता. याचबरोबर कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पिरनवाडी येथे देखील सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दक्षिणमधील म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर हे बुधवारी अनवाणी पायांनी मतदारांचा आशीर्वाद घेत होते. मतदारांनीही स्वयंस्फूर्तीने त्यांना आशीर्वाद bदिला. काही ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये अंधार पडत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मात्र ईव्हीएम यंत्राजवळ प्रकाश देण्यासाठी दिवा लावला तर यंत्र बंद पडू शकते, असे म्हणत निवडणूक अधिकाऱ्यांनी असलेल्या प्रकाशामध्येच मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान केंद्रांच्या परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एकूण दक्षिणमधील मतदान हे अत्यंत चुरशीने आणि शांततेत पार पडले आहे. आता शनिवार दि. 13 मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.









